हवामान

भारतीय हवामान खात्याचे यावर्षीचे अंदाज सपशेल चुकले? का चुकते हवामान खाते?

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे साहजिकच भारतासाठी आणि शेती क्षेत्रासाठी आवश्यक असणारा पाऊस म्हणजेच मान्सून  आणि त्याची स्थिती भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण भारताची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे आणि कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून असल्याने त्याला खूप मोठे महत्त्व आहे. परंतु सध्याची जर एकंदरी स्थिती पाहिली तर भारतातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली असून संपूर्ण राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहे. अगोदरच मान्सूनचे आगमन यावर्षी उशिराने झाले आणि सुरुवातच मुळात खूप निराशा जनक झाली.

नंतर जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु त्यानंतर मात्र अजूनही महाराष्ट्र कोरडाठाक असून खरिपाच्या पिकांनी मात्र आता माना टाकल्या आहेत. जर अजून काही दिवस पाऊस आला नाही तर खरीप हंगाम हातचा गेलाच आहे आणि पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामाचे कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे स्वतःच्या पोट पाण्याचा प्रश्न आहेच परंतु पिण्याचा आणि जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे.

राज्यातील धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावलेला असल्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईची देखील उग्र समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण सध्या विचार केला तर दुष्काळावर बोलायला कोणी तयारच नाही. राजकरणी त्यांच्या त्यांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये मशगुल असून शेतकऱ्यांचे मात्र कोणी वाली आहे की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ही झाली सगळी परिस्थिती आपल्या एकंदरीत पावसाची. यामध्ये जर आपण हवामान खात्याची भूमिका पाहिली तर पावसाचे अंदाज आणि वातावरणाचा अभ्यास करणारी ही भारतीय हवामान संस्था देखील पुरेसे अचूक अंदाज वर्तवते की नाही याबाबत देखील सांशकता आहे.

 यावर्षीचा हवामान खात्याचे अंदाज किती ठरले अचूक?

यावर्षी जर आपण हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर मान्सूनच्या पावसाबद्दल सकारात्मक असा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आलेला होता. वास्तविक पाहता भारतीय हवामान विभागाची भूमिका ही शेतकरी आणि शेतीशी निगडित असल्यामुळे या खात्याची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. यावर्षीचा हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते यावर्षी चांगला पाऊस पडेल व खरीप हंगाम चांगला राहील अशा पद्धतीचा होता.

परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर भारतावर आणि राज्यावर दुष्काळाचे सावट घोंगावत असून यावर्षी हवामान खात्याने 95 टक्के दिलेला पावसाचा अंदाज कुठे गेला हा मोठा प्रश्न आहे. हवामान खात्याचा यावर्षीचा अंदाज पाहिला तर त्यांच्यानुसार एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा होता परंतु तो केरळमध्ये दाखल झालाच नाही. नेमके हवामान विभागाचे अंदाज का चुकतात? हा देखिल एक आता संशोधनाचा विषय आहे.

आपण जगाच्या पाठीवरच्या देशांचा विचार केला तर जगातील बहुतेक देश मिनिटांचे अंदाज अगदी अचूक देत असतात. परंतु भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये महत्त्वाचे असलेले भारतीय हवामान विभाग कधी कार्यपद्धतीत सुधारणा करेल याबद्दल मोठा प्रश्न आहे. भारतीय हवामान विभागाचा विचार केला तर भारतातील पाऊस तसेच उष्णतेच्या लाटा इत्यादी बद्दल अचूक अंदाज वर्तवता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आहे का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

त्यासाठी आवश्यक असणाऱ्या डॉप्लर रडार यंत्रणा तसेच आवश्यक सुविधा आहेत का? इतर देशांसारखे हवामान उपग्रहांचे जे काही नेटवर्क आहे ते आपल्याकडे मजबूत नसले तरी या उपग्रहांच्या माध्यमातून मोबाईलवर दाखवले जाणारे तापमानाची नोंद भारतीय हवामान विभागाकडे का नसते? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

जर सध्या हवामान बदलाची परिस्थिती तसेच औद्योगीकरण व शहरीकरण यामुळे वाढते प्रदूषण व त्याचा परिणाम तापमान वाढीत व हवामान बदल झाल्यामुळे तासा तासाला वातावरणात बदल होत असतात व या बदलांची नोंद घेण्याची यंत्रणा आपल्याकडे कधी उपलब्ध होईल? हे देखील एक मोठे कोडेच आहे. अनेक प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल प्रणाली ऑपरेट करू शकेल अशी तंत्रज्ञांची फळी तरी आयएमडी कडे आहे का? असे अनेक प्रश्न भारतीय हवामान विभागाच्या संबंधी पडतात.

 यंदा का चुकला पावसाचा अंदाज?

यावर्षी जागतिक संस्था नासा व इतर जागतिक हवामान संघटनांचा भारतीय मानसून बद्दलचा विचार केला तर त्यांच्या मते भारतीय मान्सूनवर यावर्षी एल निनो चा प्रभाव राहील असा अंदाज वर्तवन्यात आलेला होता व तो आता खरा ठरताना दिसून येत आहे. परंतु भारतीय हवामान विभागाने मात्र यल निनो चा प्रभाव राहणार नाही व 95 ते 96 टक्के पाऊस पडेल असा दावा केला होता व तो आता पूर्ण चुकला असल्याचे तरी दिसून येत आहे.

आयएमडीने इंडियन ओशियन डायपोलवर खूप मोठा भरोसा ठेवला परंतु सध्या ही अवस्था खूप कमजोर झाली आणि मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यात निष्क्रिय राहिलेला अल निनो आता सक्रिय झाल्याने पावसाची शक्यता कमी झालेली आहे. जर आपल्या भारताचा विचार केला तर ला नीनाचा प्रभाव राहिला तर भारतामध्ये खूप चांगला पाऊस पडतो आणि एल निनोचा राहिला तर भारतामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

परंतु या दोनही परिस्थितीचा अभ्यास करण्यामध्ये भारतीय हवामान खाते सपशेल अपयशी ठरले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता येणारा काळ हा पावसाच्या संबंधी कसा राहील हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. परिस्थिती काहीही असली तरी महाराष्ट्रात आणि भारतात पाऊस चांगला पडणे हे भारताच्याच नव्हे तर सगळ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts