Ahmednagar News : अगोदरच पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीची परवड होवून वाताहत झालेली असताना चालू वर्षी प्रारंभीच ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. दूषित वातावरणामुळे मात्र गहू,
हरभरा, कांदा तसेच पालेभाज्या पिकांवर मावा, थ्रिप्स, अळीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यासोबत अवकाळीची संक्रात मानगुटीवर बसते की काय, याचा धसका शेतकरी वर्गाने घेतला आहे.
अलनिनोचा प्रभाव अथवा निसर्गाची अवकृपा मागील वर्षीचा खरीप पेरला तसा मातीतच गेला. उत्पादन तर नाहीच परंतु केलेला खर्च देखील फिटला नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणात गडगडले. परिणामी, कर्जाच्या डोंगरात आणखी भर पडून वार्षिक नियोजन कोलमडले.
त्यात जेमतेम असलेल्या पाणी व पाटपाण्याच्या ओलिताखाली येणाऱ्या ठराविक शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा अल्प प्रमाणात करून कमी पाण्यात येणाऱ्या चारा पिकांना प्राधान्य देत ज्वारी व हरभरा यांचा पेरा केला, तर काहींनी गहू व कांदा लागवडीला प्राधान्य दिले.
मात्र वर्षाच्या सुरूवातीलाच अवकाळीची चाहूल लागल्याने व वातावरणात वेळोवेळी बदल होत असल्याने, पिकावर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. गहू, कांदा, पालेभाज्या या पिकांवर मावा, थ्रिप्स, तसेच हरभरावर अळीचे प्रमाण वाढत असून त्याच्या अनपेक्षित हजारो रुपयांच्या फवारणीचा खर्च वाढला आहे.
त्यात हवामान खात्याने व विविध हवामान तज्ज्ञाने अवकाळी पावसाची हजेरी लागणार असल्याचे सांगिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संकटाची मालिक नशीब येत असल्याने संक्रात शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसेल की काय, या विवंचनेत बळीराजा दिसून येत आहे.