Monsoon News : यंदा भातशेती करत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाने मोठे धक्के दिले आहेत. सलग पडलेल्या पावसामुळे भाताची रोपे शेतातच कुजून जाण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, दुबार पेरण्या शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत,
मात्र ही भाताचे रोपेदेखील जगण्याच्या स्थितीत नसल्याने बळीराजा संकटात आहे. कर्जत तालुक्यात १० हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबर रग्बी हंगामातदेखील तालुक्यातील शेतकरी भाताची शेती पाणी असलेल्या भागात करतात. मात्र, खरीप हंगामात भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
यंदा २२ जून रोजी पाऊस आला. त्यानंतर पाऊस जोर धरण्याच्या मार्गावर असताना शेतकरी भाताची पेरणी करण्यात व्यस्त होते. सलग १५ दिवस पाऊस बरसल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. दरम्यान, शेतात भाताची रोपे तयार करण्यासाठी टाकलेले भाताचे बी न उगवल्याने तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी जून अखेरपर्यंत दुबार पेरण्या केल्या.
मात्र, अनेक ठिकाणी पावसामुळे या पेरण्याही वाया गेल्या. त्यामुळे या वर्षी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी भाताची लावणी सुरू झाली नाही. तर अनेक शेतकऱ्यांनी दुबार केलेली पेरणी फुकट गेली. त्यामुळे आता भाताची रोपे कशी तयार करायची असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे शेतकन्यांनी भाताची रोपे तयार करण्यासाठी राखून ठेवलेला भात बियाणे संपले आहेत. त्याचवेळी खरीप हंगामात शेतकरी हे १२५ ते १३५ दिवसांत उत्पन्न देणाऱ्या भाताची शेती करतात.
आता जुलै महिना सुरू झाल्याने पावसाचे नियोजन बघता कोणत्या जातीच्या भाताची निवड करायची आणि भाताची शेतीमधून भाताचे उत्पादन घ्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.दरवर्षी पावसाच्या अनियमीतपणामुळे आमचे होणारे नुकसान कधी टळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.