Havaman Andaj 2024 : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती. मात्र ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाली आणि पावसाने पुन्हा एकदा गेअर टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला असून यामुळे काही ठिकाणी पुन्हा एकदा पूरस्थिती तयार होणार अशी भीती व्यक्त होत आहे.
खरंतर आज पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की रिमझिम पावसाला सुरुवात होत असते. मात्र या ऑगस्ट महिन्यात यंदा रिमझिम पाऊस होणार नसून जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर येत आहे.
भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तसेच कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला होता.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने उद्या देखील राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे उद्या अर्थातच सहा ऑगस्टला राज्यातील विदर्भातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाप्रमाणेच राज्यातील कोकणात देखील उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकणातील दक्षिणेकडील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळाला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ठीक-ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर येथील जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ठीक-ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पण मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते असेही आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
उद्या खानदेशातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मात्र खानदेशात म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये उद्या कुठेच मुसळधार पाऊस पाहायला मिळणार नसल्याचेही आयएमडीने म्हटले आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला होता. पण, यंदा मात्र तसा खंड पाहायला मिळणार नाही. ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडणार नाही असे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.