Havaman Andaj:- यावर्षी पावसाने सगळ्यांचीच मोठ्या प्रमाणावर निराशा केली असून पावसाची सुरुवातच निराशा जनक झाली होती व त्यानंतर मात्र जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला व खरिपाच्या पेरण्या देखील पूर्ण झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण पावसाविना गेला व आता सप्टेंबर महिन्यात देखील जवळपास हीच स्थिती आहे. सुरुवातीला एक ते दोन दिवस सप्टेंबर महिन्यात पाऊसाला सुरुवात झाली
परंतु वातावरणातील बदलामुळे अचानक सुरू झालेला पाऊस परत थांबला होता व आता गेल्या चार ते पाच दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस होताना दिसून येत आहे. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यावर्षी पावसाने सरासरी देखील ओलांडली नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे आणि येणाऱ्या दिवसात राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सगळ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. तसेच देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास लवकर सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
26 सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवासाची शक्यता
देशातून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा 26 सप्टेंबर पासून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत उत्तर भारतातील बऱ्याच भागातून मान्सून परतण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे पाहायला गेले तर 5 ऑक्टोबर नंतर राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल अशी एक शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाची परत एन्ट्री झाली असली तरी राज्यातील पावसाची तूट भरून निघेल अशी तरी शक्यता सध्या दिसत नाही. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप बिकट परिस्थिती असून काही जिल्ह्यांमध्ये पेरण्या देखील झालेल्या नाहीत अशी स्थिती आहे. जी परिस्थिती शेतीची आहे तीच परिस्थिती पिण्याच्या पाण्याची देखील अवस्था बिकट होताना दिसून येत आहे.
संपूर्ण राज्यातील जर आपण पावसाच्या सरासरीचा विचार केला तर अजून देखील तूट कायम असून ही तूट तशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
काय आहे पावसाचा अंदाज?
जर आपण मान्सूनची सध्याची स्थिती पाहिली तर गुरुवारी मान्सूनचा आस त्याच्या सरासरी जागेपासून दक्षिणेला सरकला आहे व पश्चिम बंगालच्या उपसागरातील साडेसात किलोमीटर उंचीचे जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे ते झारखंड या राज्यासह सभोवताली तयार झाली आहे.
यामुळे 26 सप्टेंबर पर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. पावसाचा अंदाज पाहिला तर संपूर्ण कोकण तसेच मुंबई, महाराष्ट्रातील जळगाव, धुळे,नंदुरबार, नासिक, अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल व मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.