Havaman Andaj :- सध्या जर आपण थंडीचे प्रमाण पाहिले तर उत्तर भारतामध्ये दाट धुके आणि कडाक्याची थंडी सध्या दिसून येत आहे. 2024 मधील जानेवारी महिना संपला असून साधारणपणे जानेवारी महिन्याच्या मध्याला महाराष्ट्र मध्ये देखील थंडी मोठ्या प्रमाणावर वाढल्याची स्थिती होती.
त्यानंतर मात्र हवी तेवढी थंडीचे प्रमाण राज्यात सध्या दिसून येत नाहीये. महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण राज्यांमध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ होईल अशी शक्यता जास्त आहे. तसेच या महिन्यांमध्ये संपूर्ण देशाचा विचार केला तर किमान तापमान हे सरासरीच्या वर राहणार असल्यामुळे थंडी कमी राहील अशी शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून गुरुवारी म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. याविषयीची माहिती आपण या लेखात बघू.
फेब्रुवारी महिन्यात थंडी आणि पाऊस कसा राहील?
हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान आणि पावसाचा अंदाज गुरुवारी म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी जाहीर केला व त्यानुसार पाहिले तर देशाच्या बऱ्याच भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
जर आपण देशातील मध्य प्रदेश हे राज्य वगळले तर उर्वरित संपूर्ण देशात थंडीची लाट न येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये व त्यासोबतच पूर्व मध्य भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
पावसाच्या बाबतीत पाहिले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये जर 1971 ते 2020 या काळातील एकूण फेब्रुवारी महिन्यातील पावसाची सरासरी पाहिली तर साधारणपणे 22.7 मिलिमीटर पाऊस पडतो.
यामध्ये 65 मिलिमीटर इतके पावसाचे प्रमाण उत्तर भारतात असते व ते इतर भागांपेक्षा अधिक आहे. या सरासरी नुसार हवामान विभागाच्या अंदाज वर्तवला असून विदर्भ तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून त्या तुलनेत मात्र कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.
सध्या काय आहे एल निनोची स्थिती?
प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेली एल निनोची स्थिती सध्या तीव्र असून त्या ठिकाणचे समुद्राच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत एल नीनो स्थिती कायम राहणार असून त्यानंतर मात्र ती हळूहळू निवळेल अशी शक्यता आहे. एवढेच नाही तर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह म्हणजेच धन स्थितीमध्ये असल्याने पुढील दोन महिन्यात ही स्थिती निवळुन जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.