Havaman Andaj : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून रविवारी सर्व महाराष्ट्रात व्यापला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. २६ ते २९ जून दरम्यान कोकणात जोरदार पाऊस तसेच सोसाट्याचा वारा वाहणार आहे,
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार तर विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला. शनिवारपासून मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली होती. अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेरीस पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मान्सून ८ जूनला केरळात दाखल झाला. त्यानंतर कोकणात ११ जून रोजी पोहोचलेल्या मान्सूनने तेथेच तळ ठोकला. त्यामुळे राज्यात पावसाची प्रतीक्षा करावी लागत होती. २४ जून रोजी मध्य महाराष्ट्रासह मुंबई, पुणे येथे पाऊस सुरू झाला. त्यानंतर २५ जूनला पूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्य व्यापले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मोसमी पाऊस सुरू झाला आहे.
तसेच, एकाच दिवसात मोसमी वाऱ्यांनी देशाचा मोठा प्रदेश व्यापला आहे. मान्सूनने शनिवारपासून चांगला वेग पकडला असून, संपूर्ण भारतात तो पसरत आहे. जवळपास ९० टक्के भारत मान्सूनने व्यापला आहे.
रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांमध्ये दमदार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ४३ मिमी, सोलापूर ६, सातारा ४, पुणे ६.४, तर कोल्हापूर ०.४ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकण विभागात मुंबईमध्ये ३४ मिमी, सांताक्रुझ १८, रत्नागिरी येथे ४ मिमी, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे ०.५, परभणी ०.२, बीड ०.२ तसेच विदर्भातील गोंदिया येथे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.