Maharashtra Rain : राज्यात आगामी काही दिवस दमदार पावसाचा इशारा कायम आहे. कोकण व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी ऑरेंज, रेड व यलो अॅलर्ट असून काही भागांत अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी दिसला. अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली होती. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम, तर काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या.
मान्सूनला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवारी इंदोर, दामोह, गोपालपूर भागात आहे. मध्य प्रदेशच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर ते ५.८ किलोमीटर उंचीवर ईशान्य मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आदी भागात सोमवारी जोरदार सरी बरसल्या. तर, अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
२५ ते २८ जुलैदरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत ठिकठिकाणी ऑरेंज, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी यलो अॅलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ऑरेंज व रेड अॅलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर आदी ठिकाणी यलो अॅलर्ट तर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांत ऑरेंज, यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
पाऊस (मिलीमीटरमध्ये)
मुंबई ४, सांताक्रूझ २३, अलिबाग २, रत्नागिरी २, डहाणू २, पुणे ०.९, लोहगाव ३, कोल्हापूर ४, महाबळेश्वर ५९, नाशिक २, सांगली १, सातारा ४, छत्रपती संभाजीनगर ०.४, परभणी ६, नागपूर ४.