July 2024 Havaman Andaj : मान्सूनच्या दुसऱ्या महिन्याला अर्थातच जुलै महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात मोसमी पावसाने दडी मारली होती. गेल्या महिन्यात मोसमी पावसाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. कुठे खूपच जास्त पाऊस, तर कुठे खूपच कमी पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात होती.
यामुळे जुलैमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार हा मोठा सवाल आहे. खरे तर मानसूनने नुकताच संपूर्ण भारत काबीज केला आहे. मान्सून संपूर्ण भारतात दाखल झाला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी जुलै महिन्यात महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यात जास्ती पाऊस राहणार? कोठे सरासरी एवढा तर कुठे सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस राहणार? या संदर्भात सविस्तर अशी अपडेट दिली आहे.
काय म्हणतात माणिकराव खुळे
गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथा परिसर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पावसाचा अक्षरशः लपंडाव सुरू होता. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्यात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
जोरदार पाऊस फक्त कोकण आणि घाटमाथा परिसरावर होता. दरम्यान या चालू महिन्यात पूर्व तामिळनाडू, लेह, लद्दाख आणि पुर्वोत्तर भागातील सात राज्य वगळता संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज आहे.
महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर जुलै महिना राज्यासाठी मोठा दिलासादायी ठरणार आहे. कारण की या महिन्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार नाही. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडणार आहे.
परंतु काही जिल्ह्यात सरासरी एवढाच पाऊस राहणार आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण जुलैमध्ये आपल्या राज्यातील जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि खानदेशातील जळगाव जिल्ह्यात 94 ते 104% म्हणजे सरासरी एवढा पाऊस पडेल असे म्हटले जात आहे. उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार आहे.
तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात तर 106 टक्क्यांपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावरून काही जिल्ह्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होऊ शकते असे वाटतं आहे.
एकंदरीत गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव सुरू होता मात्र चालू जुलै महिना हा जोरदार पावसाचा राहणार असून जून महिन्यातील पावसाची तूट देखील या चालू महिन्यात भरून निघण्याची शक्यता आहे.