Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात नुकतीच एक मोठी अपडेट दिली आहे. खरंतर, सध्या मान्सून आपल्या अंतिम चरणात आला आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की साऱ्यांना मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे वेध लागत असते. गेल्यावर्षी महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात पावसाचे प्रमाण फारच कमी होते. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे.
यावर्षीच्या मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येचं राज्यात चांगला दमदार पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवात देखील दमदार पावसाने झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या काळात राज्यात चांगला जोरदार पाऊस झाला आहे.
तदनंतर पावसाने थोडा काळ विश्रांती घेतली. पण पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या दिवसापासून म्हणजेच सात सप्टेंबर ते १० सप्टेंबर या काळात राज्यात चांगला पाऊस झाला. यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा विरला असल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे, आता भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. दरवर्षी मान्सून सप्टेंबरच्या अखेरीस निघून जातो, पण यावेळी तशी शक्यता नाहीये. सध्या हवामान खात्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.
पण महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर सुद्धा बऱ्याच अंशी कमी झाला आहे. याबाबत भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, आता उत्तर प्रदेशात मान्सून कमकुवत होण्यास सुरुवात होणार आहे, मात्र तो उत्तर प्रदेश मधून कधी परतणार हे सांगणे थोडे कठीण आहे.
पण सध्या देशातील हवामानात बदल झाल्याचे दिसून येत आहे. 2023 मध्ये मान्सूनने 25 सप्टेंबरला निरोप घेतला होता पण यावेळी 25 ऑक्टोबरपर्यंत मान्सून निरोप घेणार असा अंदाज आहे. अर्थातच यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास थोडा उशिराने सुरू होणार आहे.
यावेळी मान्सूनला उशीर होण्याचे कारण म्हणजे ‘यागी’ वादळ. या वादळामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास थोडासा लांबणार आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, ला निना अजूनही तटस्थ आहे.
अशा स्थितीत यावेळी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेने इशारा दिला आहे की ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत ला निनाची तीव्रता 60 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.