Maharashtra Monsoon : गेल्यावर्षी एलनिनोमुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणून अनेक भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. परंतु यंदा मानसूनने सर्वच कसर भरून काढली आहे. मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला की गेल्या सात वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण मानसून कालावधीत म्हणजेच एक जून ते 30 ऑक्टोबर या काळात सरासरी 836 मिलिमीटर एवढा पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा मात्र एक जून ते दोन सप्टेंबर 2024 या कालावधीतच एक हजार तीन मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.
म्हणजेच सरासरीपेक्षा 120% अधिक पाऊस झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच संपूर्ण मान्सूनमध्ये जेवढा पाऊस होतो त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या सात वर्षांमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस होत असून कदाचित आगामी काळात आणखी काही वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले जातील असे बोलले जाऊ लागले आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचे प्रमाण कमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर आणि विदर्भातील अमरावती, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमान कमी आहे. कृषी विभागाने या सहा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील ही धरणे ओव्हर फ्लो
महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील बहुतांशी धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. यामुळे काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महत्वाचे म्हणजे 31 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून अजूनही राज्यात जोरदार पाऊस सुरूच आहे.
यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. मूग, सोयाबीन, उडीद, मका अशा विविध पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे कांदा लागवड देखील खोळंबली आहे. या जोरदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील 26 पैकी 21 धरणे फुल भरली आहेत.
उजनी, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, वीर, नाझरे, निरा देवधर, भाटघर, आंद्रा, पवना, मुळशी, कासारसाई, टेमघर, वरसगाव ही धरणे 100% भरली असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा खोऱ्यात एकूण 13 धरणे असून या सर्व धरणांमध्ये 99% पेक्षा अधिक पाणी आले आहे.
या भागातील तुळशी, कासारी, पाटगाव, येरळवाडी, ऊरमोडी, तारळी, कण्हेर, राधानगरी, कोयना ही धरणे १०० टक्के भरली आहेत. उर्वरित धरणातही जवळपास 99% च्या आसपास पाणीसाठा उपलब्ध आहे. एकंदरीत यावर्षी महाराष्ट्रात गेल्या वर्षी सारखी परिस्थिती राहणार नाही.
राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, मात्र यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार आहे. जवळपास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत राज्यात चांगला पाऊस राहणार आहे. यामुळे या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद असलेल्या जिल्ह्यांमध्येही सरासरी एवढा पाऊस होईल अशी आशा आहे.