Maharashtra Monsoon News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. ही भीती वाटण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाचा तब्बल 14 ते 15 दिवसाचा मोठा खंड पाहायला मिळाला होता. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला होता.
यामुळे यंदाही याच घटनेची पुनरावृत्ती होणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटणे स्वाभाविक होते. मात्र ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा पावसाचे रंगरूप सर्वांसमोर आलेत. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या पाच दिवसात मान्सूनची सक्रियता चांगलीच जाणवली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे आणि नाशिक मध्ये तर पावसाचा जोर सर्वात जास्त पाहायला मिळाला आहे.
अशा परिस्थितीत आता पुढील आठवडाभर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती कशी राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. अशातच भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी आगामी काही दिवसाचे हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
पुढील आठवडाभर कसे राहणार हवामान ?
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 6 ऑगस्ट पासून ते पुढील आठवडाभर कोकण, विदर्भ, नाशिकसह खान्देश वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.
अर्थातच आजपासून 13 ऑगस्टपर्यंत राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे.
मात्र या कालावधीत म्हणजेच 13 ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे.