Maharashtra News :- ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे तापत आहे. खरीप हंगामातील पिकेच करपू लागलीत. त्यामुळे रब्बीचीही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी ऑगस्ट कोरडा गेला. आता सप्टेंबरमध्ये तरी भरपूर पाऊस पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
राज्यातल्या दहा जिह्यांतल्या 21 तालुक्यांमध्ये आजच्या तारखेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातल्या 297 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपासून वरुणराजा रुसला आहे. त्यामुळे राज्यात यंदा अन्नधान्य टंचाई निर्माण होण्याची भीती कृषी खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
‘एल निनो’चा फटका बसून देशातील पाऊसमान कमी राहण्याचे अंदाज खरे ठरले आहेत. मुळात गेली काही वर्षे जूनमध्ये पावसाच्या आगमनाचे वेळापत्रक सातत्याने चुकते आहे, त्याची यंदाही पुनरावृत्ती झाली. जुलैमध्ये अनेक भागांत चांगला पाऊस झाला, पण पुन्हा ऑगस्ट महिन्यात त्याने विश्रांती घेतली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात यंदा दुष्काळाचे सावट पडले आहे,पिके चांगली बहरू लागली असतानाच ऑगस्ट ५७ महिन्यात पावसाने पूर्णत: ओढ दिल्याने ती करपू लागली आहेत. पाऊस लांबल्याने अशी पिके वाया जाऊ लागल्याने आता जनावरांच्या चाऱ्यावर परिणाम होऊ लागला आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
राज्यात पावसाने दीर्घकाळ मारलेल्या दडीमुळे दुष्काळाचे संकट गडद होऊ लागले आहे. ऑगस्टमध्ये तर जवळपास पूर्ण महिनाच ओढ दिल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रावरील ६९ टक्के शेतीपिके आणि फळपिके बाधित झाली असल्याचे सरकारच्या ‘पीकपाहणी अहवालातून पुढे आले आहे.
राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. पिके वाया जात असतानाच जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे संकटही वाढत आहे.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱयांचे हातचे पीक निघून गेल्याचे पाहता या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.