Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून रजेवर असणारा पाऊस पुन्हा हजेरी लावण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. खरे तर जवळपास आठ ते नऊ दिवस राज्यात पावसाचा खंड पडला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत होती.
शेतकऱ्यांचा जीव आधी अतिवृष्टीमुळे आणि नंतर पावसाचा खंड पडल्याने टांगणीला लागला होता. परंतु आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सक्रियता आहे. 16 ऑगस्टला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.
पण 17 ऑगस्टला पावसाचा जोर वाढला, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सांगलीमध्ये ठिकठिकाणी ढगफुटी झाली आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा अशा विविध जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा फारच अधिक होता. महाबळेश्वर मध्ये नदी नाल्यांना विक्राळ स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय हवामान खात्याने आजपासून निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या दक्षिण बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. उद्या म्हणजेच 19 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
साहजिकच यामुळे देशाच्या विविध भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. आपल्या राज्यातही याच कारणाने पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
कोकण : कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र : आज पासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाडा : आय एम डी ने मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भ : पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज पासून पावसाला सुरुवात होणार आहे.