Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस झाला असून यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक पाहायला मिळाले. पण आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर फारच कमी झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
पण विदर्भ, अन मराठवाड्यासह राज्याच्या उर्वरित भागात पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच जिथे पावसाची उघडीप होती त्या ठिकाणी उन्हाचा चटका वाढलेला होता. उकाड्यातही मोठी वाढ झाली होती.
काल फक्त कोकणातच पावसाची तीव्रता जाणवली. आयएमडी कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल कोकण विभागातील संगमेश्वर येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे. या भागात काल चक्क ११० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.
पण आज मात्र राज्यातील अनेक भागांमधून पाऊस उसंत घेणार आहे. आज विदर्भातील तीन मध्य महाराष्ट्रातील एक आणि कोकणातील एक अशा पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातील फक्त दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट मिळाला आहे तर उर्वरित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण कोकणातील रायगड अन मध्य महाराष्ट्रातील पुणे प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड आणि पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ बाबत बोलायचं झालं तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट मिळाला आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या तुलनेत येथे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.