Maharashtra Rain : गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सुद्धा झाली. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
यामुळे ज्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता तेथील शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने सदर भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सततच्या पावसाने आणि ढगाळ हवामानामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने पीक पुन्हा एकदा उभारी घेऊ लागले आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आगामी तीन दिवसानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्ट पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. 16 ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण कोकण, संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर वगळता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील या संबंधित विभागातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये या कालावधीत जोरदार पाऊस पडणारा असा अंदाज आयडीने दिला आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
राज्याच्या उर्वरित भागात फक्त मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अर्थातच 13, 14 आणि 15 ऑगस्टला महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कमी राहील असे म्हटले जात आहे. मात्र हे तीन दिवस उलटल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. 16 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.