Maharashtra Rain:- जून महिन्याची सुरुवातच मुळात पावसाविना झाली. मध्येच निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासावर विपरीत परिणाम झाला व त्याची गती मंदावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात पेरण्या रखडल्या होत्या. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली व रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग देखील आला.
त्यानंतर आता परत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारलेली होती. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट बघत होते.या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाने एक सुखद वार्ता दिली असून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये कमी अधिक फरकाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये किरकोळ ते माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी पावसाने दडी मारल्याचे चित्र सध्या आहे. अर्धा जुलै महिना संपत आला तरी राज्यांमध्ये हवा तेवढा पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चिंतेत भर पडलेली आहे. परंतु या दरम्यान मुंबई सह उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून ठाणे, पालघर तसेच वाशिम यवतमाळ तसेच नंदुरबार या जिल्ह्यांत देखील पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.
या भागात पडणार पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मराठवाड्यासह इतर काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या विदर्भामधील वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस बरसला असून रिसोड तालुक्यातील कोयाळी या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला आहे. गेल्या 30 वर्षात इतका पाऊस गावात पडला नव्हता असे गावातील नागरिक सांगत आहेत. यासोबतच पालघर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणांमध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
तसेच या ठिकाणी असलेले कवडास धरण देखील तुडुंब झाले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात देखील गेल्या तीन दिवसापासून पावसाचे संतत धार सुरू असून सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नदीनाऱ्यांना पूर आले आहेत. तसेच मध्य प्रदेश राज्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे तापी नदीला आलेल्या पाण्यामुळे हातनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. अशा पद्धतीने राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून बळीराजा आनंदीत असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.