Maharashtra Rain : उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. खरे तर, सप्टेंबर महिना सुरू झाला की परतीच्या पावसाचे वेध लागत असते. सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत यंदा पाऊस सुरूच राहणार आहे.
यावर्षी सप्टेंबरच्या शेवटी परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. परिणामी ऑक्टोबरमध्येही यावर्षी चांगल्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याची सुरुवात ही जोरदार पावसाने होणार आहे.
हवामान खात्याने 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतो?
IMD च्या अंदाजानुसार, उद्या सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विदर्भ विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
एक आणि दोन सप्टेंबरला पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.
उद्या विदर्भातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार?
आय एम डी ने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना एक ते चार सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन आणि चार सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट जारी झाला आहे.