Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. मात्र गेल्या 6-7 दिवसांपासून पावसाचा जोर खूपच कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने सध्या शेत शिवारात शेतीच्या कामांना वेग आला आहे. फवारणी व इतर मशागतीच्या कामांनी गती पकडली आहे. विशेष म्हणजे काही कमी दिवसाचे पीक काढणीसाठी देखील आले आहे.
मूग पीक हार्वेस्टिंग साठी तयार झाले आहे. यामुळे पावसाची विश्रांती हार्वेस्टिंगसाठी फायद्याची ठरत आहे. दुसरीकडे जुलैपासून सुरू झालेल्या सततच्या पावसाने डाळिंब पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट पाहायला मिळत होते. आता मात्र हवामान कोरडे झाले असल्याने डाळिंब पिकासाठी सध्याचे हवामान पोषक ठरत आहे.
शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत
मात्र असे असले तरी अनेक भागातील शेतकरी बांधव जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाचा खंड पडला असल्याने गतवर्षी सारखीच परिस्थिती तर तयार होणार नाही ना अशी भीती देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
अशातच आता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून पावसासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार येत्या चार-पाच दिवसांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ.के एस. होसाळीकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात होसाळीकर यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सविस्तर अपडेट दिली आहे.
मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार
येत्या चार-पाच दिवसांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटांसह पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. कुठेच जोरदार पाऊस पडणार नाही असा अंदाज आयएमडीने दिला आहे. पण काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारून चालणार नाही.
16 ऑगस्ट : 16 ऑगस्टला देखील महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिल असा अंदाज आहे. तरीही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
17 ऑगस्ट : 17 तारखेला सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
18 ऑगस्ट : 18 तारखेला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या 6 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सदर जिल्ह्यांना 18 तारखेला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.