गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला असून संपूर्ण राज्यामध्ये चांगला पाऊस बरसत आहे. तसेच राज्याच्या बराच भागांमध्ये ढगाळ वातावरण तर अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना देखील वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. या अनुषंगाने जर आपण हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते राज्यातील घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्यासोबतच कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज या परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. कोकणातील रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाचा कोणत्या जिल्ह्यांना आहे कोणता अलर्ट?
1- अति जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट– राज्यातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
2- जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट–राज्यातील ठाणे,मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, नासिक, अहमदनगर,सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
3-
विजासह पावसाचा इशारा म्हणजेच यलो अलर्ट– मध्यमहाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.सध्या भारतातील मान्सूनची स्थिती
सध्या मान्सूनचा आस असलेला जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो राजस्थानच्या बिकानेर पासून चूरू, गुना, सिधी, अंबिकापुर, बालासोर पासून मध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात पासून केरळ किनारपट्टी पर्यंत विस्तारला गेलेला आहे. पंधरा अंश उत्तर अक्षांशालगत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र आहे. आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारांची स्थिती देखील तयार झाली आहे.