Maharashtra Weather:- सध्या काही दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली असून बऱ्याच ठिकाणच्या तापमानाचा पारा घसरलेला आहे. ऐन दिवाळीमध्ये गुलाबी थंडीमध्येच राज्यातील कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला.
तसेच काही भागांमध्ये अधून मधून ढगाळ वातावरण आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच ठिकाणी तारांबळ उडाली. तसेच आलेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीसाठी आलेल्या काही पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पाच दिवसात राज्यामधील हवामान कसे राहील? याबाबत हवामान विभागाच्या माध्यमातून काय अंदाज वर्तवण्यात आला आहे याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
आगामी पाच दिवसात राज्यातील हवामान कसे राहणार?
दिवाळीच्या धामधुमीत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दिवाळीच्या खरेदीचा हिरमोड झाला. याच पार्श्वभूमीवर जर राज्यातील पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा विचार केला तर ते कोरडे किंवा अंशतः ढगाळ राहिला असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी असून यामध्ये राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
कारण अंदमान समुद्र आणि मध्य व दक्षिण भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासांमध्ये वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार होण्याची शक्यता आहे व त्यामुळे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर एक ते दोन अंशाने वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यातील काही भागात तापमान कमाल 30 अंशाच्या पुढे
तसेच दुसरे महत्वाचे म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये दिवसा तापमानाने कमाल 30° अंशाचा पारा ओलांडल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील जळगावात कमाल तापमानाने 35.7° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली असून किमान आपण त्या ठिकाणी 15 ते 25 अंशाच्या दरम्यान आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवसांचा विचार केला तर राज्यातील किमान तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून त्यानंतर मात्र त्यामध्ये एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.