Maharashtra News : एकीकडे काही भागांत उष्णतेची लाट, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अशा अत्यंत विषम वातावरणाचा सामना सध्या महाराष्ट्र करीत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भाग सोमवारी कडक उन्हाने अक्षरशः भाजून निघाले.
येते काही दिवस राज्यात उष्णतेची लाट ठाण मांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे आताच ही परिस्थिती तर पुढे कडक उन्हाळ्याच्या मानल्या जाणाऱ्या मे महिन्यात काय अवस्था असेल, हा प्रश्न नागरिकांच्या काळजीचा पारा वाढवत आहे.
राज्यातील पावसाळी वातावरण निवळत असून, आकाश निरभ्र राहात आहे. त्यातच प्रतिचक्रवातामुळे गुजरातहून गरम वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून,
याबरोबरच एल निनो या घटकामुळेही यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पुढच्या महिन्यातही मध्य आणि उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहील,
असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. मात्र मंगळवारपासून ढगाळ हवामान नाहीसे होणार असून, आकाश निरभ्र होऊन राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
त्यामुळे कमाल तापमानात वेगाने वाढ होणार आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान यवतमाळ येथे २२ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने ३० एप्रिल ते ३ मेदरम्यान कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा,
हवामान दमट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. ३० एप्रिलला विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे.
यामुळे होतेय होरपळ
प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एल निनो हा घटकामुळेही यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्याचाही परिणाम पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये होत असल्याचे दिसते.
तसेच माती कोरडी होत असल्यामुळे जमिनीकडून उष्णता मोठ्या प्रमाणात शोषून घेतली जात आहे, तसेच परावर्तितही होत आहे. त्यामुळे उष्म्याची धग आणखी वाढत आहे.