Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही.
सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग घेऊन पेरण्या देखील पूर्ण झाल्या. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणचा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याचे सध्या चित्र आहे.
सध्या येणाऱ्या दिवसाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
सध्याची जर वातावरणाची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती नसून येणारा पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजेच सात ते आठ सप्टेंबर पर्यंत मुंबई, कोकण आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पाऊस पडेल व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
पावसाला पोषक वातावरण नसल्यामुळे ठराविक जिल्ह्यामध्येच काही ठिकाणी हलका पाऊस पडत असून हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येणारा पूर्ण पंधरवड्यामध्ये मान्सूनच्या पावसाकरिता अनुकूल स्थिती नसल्याने सरासरी पेक्षा देखील कमी पाऊस पडेल.
परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्व दूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याबाबत अधिकची माहिती देताना हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी म्हणाले की येत्या सात दिवसांमध्ये राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु हा पाऊस सरासरीच्या कितीतरी कमी असेल. त्यानंतरच्या आठवड्यात देखील ही स्थिती जैसे ते राहील मात्र त्यात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रामध्ये मान्सूनला पोषक प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे व त्यामुळे संपूर्ण राज्यभर सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल असे देखील त्यांनी म्हटले.