हवामान

पुढील ४ दिवस पावसाचे..! कोकण व मध्य महाराष्ट्रात ऑरेंज व यलो अॅलर्ट

Maharashtra Rain : राज्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी पावसाचे आहेत. कोकण व मध्य महाराष्ट्रात ऑरेंज व यलो अॅलर्ट असून काही भागांत अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडला. तसेच राज्याच्या उर्वरित भागांतही पाऊस पडला आहे.

मान्सूनला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर ते उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे.

सोमवारपर्यंत बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे वारे वेगाने वाहून सोबत ढग येतील आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. त्यात महाराष्ट्राचा पूर्व भाग व्यापला जाऊन जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल.

रविवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील पुणे शहर १.३ मिमी, लोहगाव ४, कोल्हापूर १४, महाबळेश्वर ८४, नाशिक ८, सांगली ५ तर सातारा ३ मिमी पावसाची नोंद झाली. कोकण भागातील मुंबईत ९ मिमी, सांताक्रुझ २०, रत्नागिरी ११, तर डहाणूमध्ये २८ मिमी पाऊस बरसला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ मिमी पाऊस पडला. विदर्भातील बुलढाणामध्ये २, गोंदिया १ तर नागपूरमध्ये ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत आहे. लोणावळ्यामध्ये १२८ मिमी, शिरगाव १७०, शिरोटा ६२, ठाकूरवाडी ४०, वळवण १२३, अम्बोणे २१०, भिवपुरी १०४, दावडी १९२, डुंगरवाडी १८७, कोयना १४०, खोपोली ९७, खंद ११२, ताम्हिणी २३०, भिरा १४९ तर धारावीत ५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

२४ ते २७ जुलैदरम्यान,कोकणात ऑरेंज व यलो अॅलर्ट असून किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ऑरेंज अॅलर्ट आहे. त्यासोबतच मराठवाड्यात यलो अॅलर्ट असून बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात यलो अॅलर्ट असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office