Maharashtra Rain : यंदाच्या मोसमात जूनमध्ये निर्माण झालेली मान्सूनची तूट जुलै महिन्यात भरून निघाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात १३ टक्के अधिक पाऊस झाला, तर मान्सूनचे दुसरे सत्र म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सामान्य पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सूनच्या दुसऱ्या सत्रात पूर्वमध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग आणि हिमालयाच्या काही उपविभागांत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर वायव्य आणि मध्य भारताच्या पश्चिम भागांमध्ये आणि द्वीपकल्पीय भागात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे,
अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. देशभरात जुलै महिन्यात १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व आणि ईशान्य भगात १९०१ पासून या महिन्यातील तिसरा सर्वात कमी पाऊस पडला.
तर वायव्य भारतात २००१ पासून जुलै महिन्यातील सर्वाधिक २५८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशभरात मान्सूनच्या पावसात चढ-उतार पाहायला मिळाला आहे. देशात जूनमध्ये ९ टक्के कमी पाऊस पडला, तर जुलै महिन्यात १३ टक्के जास्त पाऊस झाला. देशभरात आतापर्यंत सामान्य पावसाच्या (४४५.८ मिमी) तुलनेत ४६७ मिमी पाऊस झाला आहे. तसेच अल निनोचा आतापर्यंत मान्सूनवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे मोहपात्रा यांनी सांगितले.
अनेक भागांत पाण्याचे संकट – सरकार
लोकसंख्या वाढीसह विविध कारणांमुळे अनेक भागांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्याच्या तुटवड्याची स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती सरकारने सोमवारी संसदेत व्यक्त केली. कोणत्याही क्षेत्र तथा देशातील सरासरी वार्षिक जल उपलब्धता ही प्रामुख्याने हवामान आणि भूवैज्ञानिक घटकांवर अवलंबून असते.
मात्र प्रति व्यक्ती पाण्याची उपलब्धता देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून •असते. त्यामुळे देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबर पावसातील बदलामुळे प्रति व्यक्ती पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याचे जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. तसेच पाणी हा राज्याचा विषय आहे. तर पाणी संवर्धनासाठी केंद्र सरकार विविध योजना व कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यांना मदत करत असते, असे टुडू यांनी स्पष्ट केले.