Panjabrao Dakh : उद्यापासून सप्टेंबर महिना सूरु होणार आहे. सप्टेंबर हा मान्सूनचा शेवटचा महिना असतो. सप्टेंबर मध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराने सुरू होणार असा दावा हवामान खात्याने केला आहे. यंदा सप्टेंबरच्या शेवटी परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे.
दुसरीकडे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज मध्य रात्रीपासून म्हणजेच 31 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी कडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिला आहे.
आज मध्य रात्रीपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असून या काळात पावसाचे थेंब मोठे असतील, वारा वाहणार आहे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. राज्यात जवळपास 1 सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत पूर्व आणि पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश मध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात पावसाचा दोन-दोन दिवसाचा मुक्काम राहणार आहे.
या कालावधीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज डख यांनी दिला आहे.
कोण-कोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार
एक सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली म्हणजेच राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
एवढेच नाही तर पंजाबरावांनी मराठवाडातील जायकवाडी धरण पाच सप्टेंबर पर्यंत शंभर टक्के क्षमतेने भरेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
एक सप्टेंबर पासून उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधील पाणी जायकवाडी मध्ये सोडले जाईल आणि यामुळे हे धरण लवकर भरेल असे म्हटले आहे.
यंदा दोन सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण आहे आणि या बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.