Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे. काल राज्यातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे मात्र अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
काल विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
दरम्यान आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे.
अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 4, 5 जुलैला विदर्भ आणि सहा जुलैपर्यंत मराठवाड्यात पाऊस येईल असे म्हटले होते.
यानुसार मराठवाड्यापर्यंत पाऊस दाखल झाला आहे. विशेष म्हणजे आता पाऊस उत्तर महाराष्ट्र, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील ज्या भागात अजून पाऊस आलेला नाही तिथेही जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
या भागात आठ नऊ, जुलैला पाऊस परत सक्रिय होणार आहे. तसेच त्यांनी राज्यात 11 जुलै पर्यंत पाऊस पडतच राहणार असे म्हटले आहे. पंजाब रावांनी या आपल्या नवीन हवामान अंदाजात 10 जुलैपासून ते 15 जुलै पर्यंत राज्यात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ते म्हणतात की या कालावधीत दरवर्षी चांगला पाऊस पडत असतो. यामुळे यंदा सुद्धा या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. दहा ते पंधरा जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडणार असे पंजाबरावांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे.
तसेच त्यांनी या वर्षी संपूर्ण जुलै महिन्यातचं चांगला जोराचा पाऊस राहणार, पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असा आशावाद पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
जुलैमध्ये 16 तारखेला आणि वीस तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेषतः 15 ते 16 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच त्यांनी आपल्या नवीन अंदाजात जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निश्चितच जर पंजाब रावांचा हा अंदाज खरा ठरला तर जोरदार पावसाच्या प्रतीक्षात असणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.