Panjabrao Dakh Havaman Andaj : काल अर्थात 27 जुलैला ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. खरंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र तदनंतर राज्यात पावसाचा जोर वाढला. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. पावसाची तीव्रता कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भात अधिक पाहायला मिळाली.
यातील काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. यामुळे पूरस्थिती तयार झाली. पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात पूरस्थितीमुळे सर्वसामान्य जनजीवन अगदी विस्कळीत झाले.
कोकणात आणि विदर्भातही काही ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळाली. या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तथापि गेल्या दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे.
यामुळे पूरस्थिती निवळली असून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन पूर्व पदावर येत आहे. अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल एक नवीन हवामान अंदाज दिला आहे.
त्यांनी राज्यात 28, 29 आणि 30 जुलैला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात पावसाचा जोर वाढणार असून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या काळात महाराष्ट्रात दररोज भाग बदलत पाऊस पडत राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. पंजाबरावांच्या अंदाजाप्रमाणे या काळात राज्यात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कुठे अतिवृष्टी होणार आहे.
या कालावधीत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे.
एकंदरीत, आजपासून पाच ऑगस्टपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात या कालावधीत चांगला पाऊस राहणार आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार असे पंजाबरावांनी यावेळी नमूद केले आहे.
पावसाची ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी त्यांना जशी सवड मिळेल, जेव्हा पावसाची उघडीप राहील त्या काळात फवारणीचे कामे उरकून घ्यावीत असा सल्ला देखील पंजाबराव डख यांनी यावेळी दिला आहे.
यासोबतच डख यांनी यंदा राज्यातील सर्वच प्रमुख धरणात पाण्याची चांगली आवक येणार असून सर्व धरणे यंदा भरणार आहेत असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी यांसारखी धरणे यंदा फुल भरतीला असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.