मान्सूनचे आगमन आणि मान्सूनचा प्रवास हा वेगात होत असल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने बदल होताना दिसून येत आहे.पावसासाठी जे पोषक वातावरण हवे असते तसे वातावरण आता तयार होताना दिसत असल्याने लवकरात लवकर राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे व आता या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रावांनी देखील पाच ते आठ जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिलेला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केलेली आहे.
राज्यातील या भागात आहे मुसळधार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सातारा, सांगली तसेच सोलापूर, कोल्हापूर तसेच जळगाव,धुळे,नंदुरबार, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर, उस्मानाबाद आणि पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिलेली आहे.
9 ते 14 जून दरम्यान राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस
त्यासोबतच पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये नऊ ते 14 जून दरम्यान सातारा, सांगली तसेच पुणे, कोकण, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई येथील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे.
याशिवाय या कालावधीत धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बीड आणि परभणी या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवलेली असून साधारणपणे आज पासून ते 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू होणार आहे.
राज्यातील काही भागात होऊ शकतो पेरणी करण्यायोग्य पाऊस
सध्या जो काही राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडत आहे तो भाग बदलत पडणारा पाऊस असून या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये पेरणी व्हायला आवश्यक असा पाऊस होण्याची दाट शक्यता देखील पंजाबरावांनी व्यक्त केली आहे. म्हणजे जून महिन्याच्या कालावधीत राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
एवढेच नाही तर पुढच्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. कारण सध्या राज्यामध्ये मान्सून करिता पोषक वातावरण तयार झालेले आहे. परंतु सध्या तरी राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून येत आहे.