Panjab Dakh : राज्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून मोसमीं पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहतोय. वास्तविक राज्यात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले. मात्र, राज्यात मान्सून आगमन झाल्यानंतरही अद्याप मानसून तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातच खिळून बसला आहे.
अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढील प्रवास करण्यात अडथळे येत आहेत. अशातच मात्र हवामान तज्ञ पंजाब डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18 जूनपर्यंत जोराने वारे वाहणार आहेत. मात्र त्यानंतर मान्सूनचा जोर वाढणार आहे.
25 जून पासून मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. 25 जून पासून ते 15 जुलै पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. या कालावधीत राज्यातील सर्व भागात पेरणी योग्य पाऊस पडेल असं सांगितलं जात आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात 25 जून पासून ते एक जुलै पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असून या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असा आशावाद देखील डख यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
एकंदरीत, आणखी एका आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान हवामान विभागाने देखील राज्यात 26 जून नंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता 26 जूननंतरच राज्यात पाऊसाला सुरवात होईल आणि पुन्हा एकदा शेतीशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढेल अस सांगितलं जात आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी मात्र जमिनीची ओल तपासूनच पेरणी करावी असा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी किमान 75 ते 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरच पेरणी करावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहेत. कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार नाही.
या व्यतिरिक्त डख यांनी यंदा दुष्काळ पडणार नाही पुरेसा पाऊस पडेल असं मत यावेळी व्यक्त केल आहे. यामुळे डख यांचा हा अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.