Maharashtra News : ऐन थंडीच्या हंगामात पुण्यात मंगळवारी (दि.९) दिवसभर रिमझिम पाऊस पडला. शहरासह उपनगरातही पावसाने हजेरी लावली. तसेच शहरावर धुक्याची दुलईही पाहायला मिळाली.
आजही (दि.१०) शहरात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, शहरात किमान तापमानात वाढ होऊन कमाल तापमानात घट झाल्याचे दिसून आले.
उत्तरेकडून थंड वारे शहराच्या दिशेने वाहत आहेत. त्यातच सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहे. महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
सोमवारी रात्रीपासून पावसाचे ढग तयार होऊ लागले होते. मंगळवारी सकाळी ढग दाटून येऊन पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळपर्यंत पुण्यात १.६ मिमी. पावसाची नोंद झाली.
दिवसभर धुके असल्यामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. दरम्यान, थंडीचा कडाका कमी झाला असून, किमान तापमान १८.२ अंशावर पोहोचले आहे.