वीज जोडणीसाठी घेतली ४५०० रुपयांची लाच वीज कर्मचारी’एसीबी’च्या जाळ्यात!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी तक्रारदाराकडून साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज कंपनीच्या असिस्टंट लाईनमनला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. यात नवनाथ नामदेव निर्मल, (वय ४३, धंदा -सहायक तंत्रज्ञ, (असिस्टंट लाईनमन) ( रा. अस्तगाव रोड, पिंप्री निर्मळ ता. राहाता) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे राहाता तालुक्यातील आडगाव खुर्द, येथील राहते घरी विद्युत जोडणी घेण्याकरिता वडिलांच्या नावे कोटेशन भरले होते.

विद्युत जोडणी लवकर देऊन मीटर बसवुन देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे ४५०० रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणीत आरोपीने पंचासमक्ष ४५००रुपये लाचेची मागणी केली.

सदरची रक्कम सोमवार दि. ८ रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडुन पंचा समक्ष, (हॉटेल साई छत्र, लोणी ता.राहाता) येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News