अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत.
एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावर दिली आहे.
वाझेंच्या पत्रात शिवसेना नेते अनिल परब यांचं नाव आलं आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचं नाव आलं आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपीकडून जेलमध्ये लिहून घेतलं जातं आणि तो पुरावा म्हणून समोर आणलं जातं.
हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझा त्यांच्यावर विश्वास आहे.
राज्यात एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे ज्यामध्ये जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा, असं असेल तर जेलमध्ये अजूनही अनेक लोक आहेत. त्यांच्याकडूनही खूप काही लिहून घेतलं जाऊ शकतं.
या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले. राष्ट्रीय तपास यंत्रणा आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्यासाठी विरोधी पक्ष गालीचे अंथरत आहे हे दुर्दैव आहे.
महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून अस्थिर करण्याचे डावपेच करत असतील तर यशस्वी होणार नाही. काल एका पत्रलेखकाचं पत्र आलं, एनआयएच्या हाती पत्र आहे. हे पत्रलेखक एनआयच्या ताब्यात आहेत.
एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी इतक्या यंत्रणा वापरल्या जात आहेत. त्या पत्राची सत्यता कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्मे आहेत याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|