मृत्यू लपवण्याबाबत दबाव नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- रुग्णालये रुग्णांवर उपचार करण्यात तर प्रयोगशाळा चाचण्या करण्याच्या कामी व्यग्र आहेत, त्यामुळे माहितीचे संकलन हा त्यांच्या प्राधान्यक्रमाचा भाग नाही.

राज्याचा आरोग्य विभाग केवळ आकडेवारीची नोंद ठेवत नाही तर प्रत्येक रुग्ण व्यक्तीची तपशीलवार माहिती नोंदवतो. त्यासाठी रात्रंदिवस काम सुरू आहे. असे असताना मृतांची माहिती लपवली हा निष्कर्ष काढणे अन्यायकारक आहे, अशी सारवासारव राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केली आहे.

राज्यातील शासन असो की प्रशासन मागील वर्षभरात मृत्यू किंवा रुग्णसंख्या लपवण्याबाबत कोणताही दबाव आरोग्य यंत्रणेवर नाही. त्यामुळे माहिती लपवण्याचा प्रश्नच येत नाही,असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले. डॉ. आवटे म्हणाले, देशातील कोरोना मृतांपैकी प्रत्येक तिसरा ते चौथा मृत्यू हा महाराष्ट्रातील आहे.

जे राज्य एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू नोंद करत आहे, त्या राज्याला मृत्यू लपवायचे असते तर केव्हाच लपवले असते. २६ मे ते ९ जून या पंधरा दिवसांच्या काळात राज्याच्या कोरोनाविषयक माहितीमध्ये तब्बल ६५५२ कोरोना मृत्यू समाविष्ट करण्यात आले आहेत.

ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे, त्यामुळे मृत्यू लपवले असे म्हणणे हा यंत्रणेवरील आरोप आहे.राज्याने यापूर्वी स्वाइन फ्लूच्या महासाथीचा सामना केला. स्वाइन फ्लू या आजाराचा संसर्ग १२ वर्षांमध्ये जेवढ्या रुग्णांना झाला, तेवढे रुग्ण आज एका दिवसात कोरोनाग्रस्त होत आहेत.

एका वर्षात जेवढे रुग्ण स्वाइन फ्लूने दगावत होते, तेवढे रुग्ण एका दिवसात दगावत आहेत,असेही ते म्हणाले. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ‘आयसीएमआर सीव्ही अ‍ॅनालिटिक्स पोर्टल’ आणि ‘कोविड इंडिया पोर्टल’चा वापर केला जातो.

प्रयोगशाळा आणि रुग्णालयांसाठी स्वतंत्र अ‍ॅप आहेत. अनेकदा रुग्णालये त्यांच्या अ‍ॅपवर माहिती अद्ययावत करत नाहीत. जिल्हास्तरावर ही माहिती संकलित करून कोविड पोर्टलवर भरली जाते. त्यामध्ये वेळ जातो आणि मृतांची माहिती प्रलंबित राहते.

प्रयोगशाळा ‘आयसीएमआर पोर्टल’वर माहिती भरतात. ती वेळेवर भरली जातेच असे नाही. त्यामुळे तपासलेल्या नमुन्याबाबत माहिती प्रलंबित राहिली असता तो रुग्ण कोविड पोर्टलवर दिसत नाही. साहजिकच ते रुग्ण बरे होऊन घरी गेले किंवा दगावले असता

ती माहिती भरण्यात अडचण येते किंवा विलंब होतो. माहितीची व्याप्ती, तांत्रिक अडचणी आणि रुग्णालये, प्रयोगशाळा स्तरावरील अडचणी यामुळे माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू राहते, मात्र त्याचा अर्थ माहिती लपवली असा होत नाही, असेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.

सहव्याधी असलेल्या रुग्णांचे मृत्यू झाले असता त्यांच्या मृत्यूची नोंद सहव्याधीने मृत्यू अशीच केली जाते, काेरोना अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात आवश्यक बदल केला जातो, मात्र त्याचा अर्थ मृत्यू किंवा आकडेवारी लपवली असा होत नाही, असे डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe