Successful Farmer: सफरचंद (Apple) नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी येत आणि अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते जम्मू आणि कश्मीरचं मनमोहक चित्र.
मित्रांनो याचं कारण देखील तसेच खास आहे जम्मू आणि कश्मीर मध्ये सफरचंदाची पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंद शेती (Apple Farming) केली जाते.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मधील थंड हवामान सफरचंदाच्या पिकासाठी अधिक अनुकूल असल्याने या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सफरचंद लागवड (Apple Cultivation) शेतकरी बांधव (Farmer) करत असतात विशेष म्हणजे या प्रदेशात उत्पादित झालेले सफरचंद पार सातासमुद्रापार विक्रीसाठी पाठवले जातात.
मात्र केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे विदर्भातील एका अवलिया शेतकऱ्याने विदर्भातील गरम हवामानात देखील सफरचंद उत्पादित करून दाखवले आहे.
यामुळे सध्या या विदर्भातील अवलिया शेतकऱ्याची संपूर्ण राज्यात चर्चा बघायला मिळत आहे. विदर्भातील यवतमाळ तालुक्यातील वाढोणा बाजार येथील युवा शेतकरी संदीप निळकंठ हांडे या शेतकऱ्याने विदर्भातील (Vidarbha) गरम हवामानात देखील जम्मू-काश्मीर प्रमाणे सफरचंद बाग (Apple Orchard) लागवड करून दाखवले आहे.
विशेष म्हणजे संदीपने लावलेल्या सफरचंद बागेत आता सफरचंद देखील लागले आहेत. यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत संदीप चर्चेचा विषय ठरत आहे.खरं पाहता संदीप एक उच्चशिक्षित तरुण आहे.
त्याने बीएससी ऍग्री चे शिक्षण घेतले आहे. मात्र या शेतकरी पुत्राने नोकरीच्या मागे न धावता काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि शेती व्यवसायात नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग संदीप करत राहिला.
याच नावीन्यपूर्ण प्रयोगापैकी एक प्रयोग म्हणजे सफरचंद लागवडीचा. संदीप यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला त्यासाठी माहितीची शोधाशोध केली. सफरचंद कसे लावले जाते? त्यासाठी उपयुक्त हवामान कसे? उपयुक्त जमीन कशी? त्यासाठी पाणी व्यवस्थापन कसे असावे? या सर्व बाबींची संदीप यांनी शोधाशोध केली. संपूर्ण माहिती जमा केली.
त्या विषयाचे सर्व ज्ञान आत्मसात केले आणि मग प्रथम 30 झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. 30 झाडांची लागवड केल्यानंतर या झाडांना चांगली फळधारणा देखील झाली.
यामुळे उच्च शिक्षित संदीप यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी हळूहळू सफरचंदाचे झाडे वाढवण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला 400 सफरचंदाची झाडांची संदीप यांची बाग आहे.
विशेष म्हणजे या बागेत आता सफरचंद देखील लागले आहेत. संदीप यांनी लावलेली सफरचंदाचे झाडे पाच फुटांपर्यंत वाढली असून आगामी काही वर्षात ती पंधरा फूट उंचीपर्यंत वाढण्याचा संदीप यांचा अंदाज आहे.
सध्या सफरचंदाच्या झाडापासून पाच किलो उत्पादन मिळत आहे भविष्यात उत्पादनात वाढ होण्याचा संदीप यांचा अंदाज असून त्यांना एका झाडापासून 40 किलो उत्पादन मिळण्याची आशा आहे.
संदीप यांनी सफरचंद लागवड करण्यासाठी हिमाचल प्रदेश मधील काही तज्ज्ञांचा देखील सल्ला घेतला आहे. निश्चितच संदीप यांनी शेती व्यवसायात केलेला हा बदल इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे.