Success Story : जळगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते केळीच्या शेकडो हेक्टर वरील बागा. निश्चितच केळीचे माहेरघर म्हणून जळगावला ओळखलं जातं. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या केळीला जीआय टॅग देखील प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना नेहमीच निसर्गाच्या दुष्टचक्राचा फटका हा बसत असतो. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वारे यामुळे केळी भागांचे मोठे नुकसान होत असते.
अनेकदा शेतकरी बांधवांना नाईलाजास्तव केळीची बाग उपटून फेकून द्यावी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च वाया जातो. मात्र जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने वादळी वाऱ्याने पूर्णपणे केळीची बाग जमीनदोस्त झालेली असताना पुन्हा एकदा तीच केळी बाग नव्याने उभी केली आणि त्या जमीनदोस्त केळी पिकातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
यामुळे या शेतकऱ्याच्या जिद्दीची ही कहाणी सध्या पंचक्रोशीत चांगलीच व्हायरल होत आहे. प्रयोगशील शेतकरी वसंत महाजन आणि त्यांची दोन मुले श्रीकांत महाजन व प्रशांत महाजन यांनी या जमीन दोस्त झालेल्या केळीच्या बागेतून लाखोंची कमाई करून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे. खरं पाहता महाजन यांनी मार्च 2022 मध्ये टिशू कल्चर च्या साह्याने तयार करण्यात आलेली 13 हजार केळी रोपे लावली.
मात्र मार्च महिन्यात लावलेली ही केळीची बाग मे महिन्यात आलेल्या वादळामुळे जमीनदोस्त झाली. मात्र त्यांनी ही केळीची बाग काढून न टाकता यां बागेला पुन्हा उभा करण्यासाठी मेहनत घेण्याचे ठरवलं. या अनुषंगाने त्यांनी केली बाग पुन्हा उभा केली त्याला माती लावली. यासाठी 70 ते 80 मजुरांना कामाला लावले, स्वतःही शेतात राबले. या कष्टामुळे ही 13000 रोपांची केळी बाग पुन्हा उभी झाली.
खरं पाहता 10 मे ला केळीची बाग पुन्हा उभी झाली मात्र 11 मे रोजी पुन्हा एकदा वादळ आलं. तरीदेखील हे कुटुंब खचलं नाही थोड्याफार प्रमाणात केळीची रोपे वाकली होती ती पुन्हा सरळ करण्यात आली. स्वतः हे तिन्ही बाप लेक बांधावर उभे राहून केळी बागाची जोपासना करत होते. अखेर जमीनदोस्त झालेली ही बाग या महाजन कुटुंबाला वाचवण्यात यश आलं. आता गेल्या आठवड्यापासून या केळी बागेची हार्वेस्टिंग सुरू आहे.
गेल्या आठवड्यात हार्वेस्टिंग झालेल्या मालाला 1950 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्यावेळी शंभर क्विंटल माल देण्यात आला आहे. नुकतेच 27 जानेवारी रोजी दुसऱ्यांदा या केळी पिकाची कापणी झाली. यावेळी तब्बल 2800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे बाजारात दाखल झालेल्या इतर मालापेक्षा या मालाला अधिक दर मिळाला आहे.
त्यामुळे महाजन कुटुंब समाधानी असून त्यांना या 13,000 केळी रोपातुन लाखोंची कमाई होण्याची आशा आहे. निश्चितच महाजन कुटुंबांनी घेतलेले हे कष्ट आणि केलेले नियोजन इतरांसाठी मार्गदर्शक राहणार असून आव्हानाला जर खंबीरपणे तोंड दिल तर निश्चितच अनिश्चिततेमध्येही लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हे यांनी दाखवून दिले आहे.