Banana Farming : राज्यात खानदेश प्रांतमध्ये केळीचीं लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या काही वर्षात केळी लागवडीखालील क्षेत्रात खानदेशात मोठी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे आता खानदेशातील शेतकरी पुत्र केळीच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. धुळे जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने देखील केळी लागवडीमध्ये एक भन्नाट प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या मौजे हिंगोली येथील कुंदन पाटील नामक शेतकऱ्याने केळीच्या पारंपारिक वाणाची लागवड करण्याऐवजी विलायची केळी लागवडीचा प्रयोग केला आहे.
खरं पाहता, ही केळी आंध्रप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. मात्र कुंदन यांनी विलायची केळी खानदेशात उत्पादित करण्याची किमया साधली असून मात्र अडीच एकरात 15 लाखांचे उत्पन्न देखील कमावले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुंदन यांना विलायची केळी लागवडी बाबत इत्यंभूत माहिती नव्हती. परिणामी त्यांनी या कामी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युब वर यासंदर्भात व्हिडिओ पाहून त्यांनी विलायची केळी लागवडीचे तंत्र शिकून घेतले. आणि आंध्रप्रदेश मध्ये उत्पादित होणारी ही केळी खानदेशाच्या मातीत उत्पादित करण्याची किमया साधली. निश्चितच केळीचे पीक खानदेशासाठी नवख नाही. या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून केळीची शेती केली जात आहे. मात्र या विभागात जी नाईन या केळीचीच मोठ्या प्रमाणात शेती होते. विलायची केळीची शेती खानदेशात पाहायला मिळत नाही.
अशा परिस्थितीत केळी लागवडीत केलेला हा नवखा प्रयोग आणि त्यापासून मिळवलेले लाखोंचे उत्पन्न सध्या पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. कुंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलायची केळी ही सामान्य केळीच्या तुलनेत आकाराने लहान असते. मात्र आकाराने लहान असणारी ही केळी खायला अतिशय रुचकर, चविष्ट अन गोड असते. परिणामी या केळीला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः शहरी भागात या केळीची मोठी मागणी आहे. मात्र मागणीच्या तुलनेत या केळीचा पुरवठा होत नाही.
केवळ आंध्रप्रदेशमध्ये या केळीची शेती होते. अशा परिस्थितीत बाजारात नेहमीच या केळीला चांगला दर मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कुंदन यांनी देखील आपल्या अडीच एकर क्षेत्रात विलायची केळी लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी आपल्या अडीच एकर क्षेत्रात विलायची केळीची तीन हजार रोपे लागवड करण्यात आली. लागवडीनंतर केळी पीक व्यवस्थापनाची सर्व बाबीचे काटेकोर पालन केले. यूट्यूबच्या माध्यमातून विलायची केळी लागवडीचे तंत्र कुणाल यांनी शिकून घेतले होते त्या तंत्राचा त्यांनी यशस्वीरित्या अवलंब केला. सध्या स्थितीला या केळीचे उत्पादन मिळत आहे.
पहिली तोडणी झाली असून चार हजार आठशे चा प्रति क्विंटलला दर मिळाला आहे. जर वातावरणात अमुलाग्र असा बदल झाला नाही आणि असाच बाजार भाव कायम राहिला तर विलायचीं केळी लागवडीतून कुंदन यांना 15 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. निश्चितच जिल्हासह संपूर्ण खानदेशात केळी उत्पादकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असतानाच कुंदन यांनी केलेला हा प्रयोग इतर केळी उत्पादकांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.