विघ्नहर्ता गणेशाचे सध्या सगळीकडे आगमन झाले असून प्रसन्न आणि उल्हासित वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने सगळीकडे वातावरण अगदी भक्तिमय झाल्याचे आपल्याला दिसून येते.याच कालावधीमध्ये अनेक भाविक हे गणेशाची विविध रूपे आणि दर्शन घेण्यासाठी अष्टविनायकांच्या दर्शनाला जातात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे हे महाराष्ट्रात असून एकमेकांच्या जवळ आहेत.
साधारणपणे जर तुम्हाला अष्टविनायकाचे दर्शन घ्यायचे असेल तर दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही संपूर्ण अष्टविनायक यात्रा पूर्ण करू शकता. महाराष्ट्र मध्ये आपल्याला माहित आहे की पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर तसेच रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी पाच अष्टविनायकाचे मंदिरे असून रायगड जिल्ह्यातील महाड व पाली येथे दोन व अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक अशी आठ ठिकाणी अष्टविनायकाचे मंदिर आहेत.
जर त्यातील आपण महाड आणि सिद्धटेक व रांजणगाव चा गणपती चा विचार केला तर हे उजव्या सोंडेचे गणपती आहेत व बाकीचे गणपती डाव्या सोंडेचे आहेत. त्यामुळे अद्भुत अशा अष्टविनायकांच्या दर्शनाला जर तुम्हाला जायचे असेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा ठरेल.
महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन आणि दर्शनाला कसे जावे?
1- मोरगाव– अष्टविनायकापैकी महत्त्वाचे असलेले मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असून बारामती शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. जेजुरी पासून 17 किलोमीटर अंतरावर मोरगाव असून या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला जेजुरी किंवा बारामती किंवा पुणे या ठिकाणहून सार्वजनिक वाहतुकीच्या सहाय्याने जाता येते.
2- थेऊर– अष्टविनायकांपैकी हा दुसरा गणपती असून गणपतीचे नाव श्री चिंतामणी असे आहे. या ठिकाणचे मंदिर खूप सुंदर असून त्याला भव्य तटबंदी आहे. या ठिकाणी चिंतामणीची मूर्ती भव्य, पूर्व दिशेला तोंड असणारी व डाव्या सोंडेची असून मूर्ती मांडी घालून बसलेल्या स्थितीत आहे. या ठिकाणच्या मंदिराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला असून देवालयाचा महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. तसेच या मंदिराच्या उत्तर दिशेला दक्षिणामुखी हनुमान स्थापित करण्यात आले आहेत.
थेऊरला कसे जावे?
थेऊर हे पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून पुण्यापासून साधारणपणे तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यावरून तुम्ही बसच्या माध्यमातून या ठिकाणी जाऊ शकता.
3- सिद्धटेक– सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती असून भीमा नदीच्या काठावर वसलेले सिद्धिविनायकाचे हे एक स्वयंभू असे स्थान आहे. सिद्धटेक मंदिर हे अहिल्याबाई होळकरांनी बांधले असून या मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू तसेच सूर्य, गणपती, आदिमाया अशी देवतांचे स्थान असून हे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकांची मूर्ती स्वयंभू असून या मंदिराचा गाभा 15 ft उंच व दहा फूट रुंद आहे. या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या सभोवती चांदीचे मखर असून श्रींच्या डाव्या बाजूला जय विजयच्या मोठ्या मूर्ती आहेत.सभा मंडपाच्या पुढे महाद्वार असून त्यावर नगार खाना आहे.
सिद्धटेकला कसे जावे?
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर इतके अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय असून दौंड होऊन गेले तर रस्त्यामध्ये भीमा नदी लागते व ती ओलांडायला होड्या असतात. मात्र सध्या त्या ठिकाणी पुलाचे काम झालेले आहे.
4- रांजणगाव– अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती असून याला महागणपती असे देखील म्हणतात व हे महागणपतीचे स्वयंभू स्थान असून 10 व्या शतकातील आहे. याठिकाणी महागणपतीला कमळाचे आसन असून या गणपतीला त्रिपुरारीवदे महागणपती असेदेखील म्हटले जाते. या नावामागे एक दंतकथा आहे व ती म्हणजे त्रिपुरासुर या दैत्याला शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या व या शक्तींचा दुरुपयोग त्रिपुरासुर करत होता व त्या माध्यमातून स्वर्गलोक व पृथ्वी लोक येथे लोकांना त्रास देत होता. त्याचा त्रास जास्त वाढल्यामुळे शेवटी अशी वेळ आली की शिवशंकरांना श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला.
रांजणगावला कसे जाता येते?
पुणे ते अहमदनगर महामार्गावर हे स्थान असून पुणे ते वाघोली आणि शिक्रापूर मार्गे शिरूरच्या अलीकडे रांजणगाव 21 किलोमीटरवर हे स्थान आहे तर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. शिरूर आणि पुण्यावरून रांजणगाव साठी बसेसची सोय आहे.
5- ओझर– अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती असून या ठिकाणाच्या श्रींची मूर्ती लांबरुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्री विघ्नेश्वरांच्या डोळ्यांमध्ये माणिक असून कपाळावर हिरा आहे. हे गणेशाचे स्वयंभू मूर्ती आहे. कुकडी नदीच्या तीरावर हे मंदिर आहे.
ओझरला कसे जाता येते?
हे स्थान जुन्नर तालुक्यात असून लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुणे शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्याकरिता सार्वजनिक वाहतुकीचे सोय उपलब्ध आहे व राहण्यासाठी धर्मशाळेची चांगली व्यवस्था आहे.
6- लेण्याद्री– अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा सहावा गणपती असून शिवनेरी किल्ल्याच्या सानिध्यात व जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशांचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गिरीजात्मक गणेशाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली असून या मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम व खोदकाम करण्यात आलेले आहे. मंदिरावर जायचे असेल तर 400 पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते.
लेण्याद्रीला कसे जावे?
लेण्याद्री हे ठिकाण जुन्नर पासून सात किलोमीटर तर पुण्यापासून 97 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून दर्शनाला जाऊ शकतात.
7- महड– वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती असून हे देखील एक स्वयंभू स्थान आहे. श्री वरद विनायकांचे मंदिर साधे व कौलारू असून मंदिराला घुमट आहे व सोनेरी कळस आहे. सोनेरी कळसावर नागाचे नक्षी असून मंदिरामध्ये दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
महडला कसे जावे?
महाड हे रायगड जिल्ह्यातील पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली ते खालापूर दरम्यान आहे. मुंबई ते खोपोली या मार्गावर खोपोलीच्या पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे महड करिता रस्ता जातो. मुंबई पासून महाड 83 किलोमीटर अंतरावर आहे व त्या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत.
8- पाली– पाली हे अष्टविनायकांपैकी आठवा गणपती असून या गणपतीला श्री बल्लाळेश्वर असे म्हणतात व हे देखील गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पालीचे मंदिर पूर्वाभमुख असून या ठिकाणी गणेशाचे कपाळ विशाल व डोळ्यांमध्ये हिरे आहेत. या ठिकाणी सुधागड या मोठ्या किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचा निसर्गरम्य परिसरामध्ये बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.
श्री बल्लाळेश्वर यांच्या दर्शनाला कसे जावे?
पाली हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून खोपोली पासून 38 किलोमीटर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. यासोबतच पनवेल ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकण या ठिकाणाहून पालीस रस्ता जातो. या ठिकाणी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत.