Types Of Basils:- आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक वनस्पतींना खूप अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये अशा वनस्पतींना खूप महत्त्व असते व अनेक आजारांवर अशा वनस्पतींचा खूप मोठा फायदा होत असतो. जर आपण औषधी वनस्पतींचा प्रामुख्याने विचार केला तर यामध्ये आपल्याला सगळ्यात जवळची ओळखीची वनस्पती म्हणजे तुळस ही होय.
ग्रामीण भागामध्ये पाहिले तर साधारणपणे प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन बांधले जाते व यामध्ये तुळशीची लागवड केली जाते. त्यासोबतच शहरी भागामध्ये देखील तुळस ही कुंड्यांमध्ये लावली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला जितके आयुर्वेदामध्ये किंवा औषधी वनस्पती म्हणून स्थान आहे तेवढेच अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील तुळस या वनस्पतीला खूप महत्त्व आहे.
औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीला हिंदू धर्मामध्ये खूप मोठे महत्त्व आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय म्हणून तुळशीचा रस किंवा तुळशीच्या पानांचा वापर देखील केला जातो हे आपल्याला माहिती आहे. या बहुपयोगी अशा तुळशीचे वेगवेगळे प्रकार आहेत व या प्रत्येक प्रकाराचे महत्त्व देखील वेगवेगळे आहे. याच अनुषंगाने आपण तुळशीच्या विविध प्रकारांची माहिती या लेखात बघणार आहोत.
हे आहे तुळशीचे प्रकार
1- कापूर तुळस– तुळशी या औषधी वनस्पतीची ही एक महत्त्वाची प्रजात असून जी जगातील टांझानिया तसेच इथिओपिया, केनिया आणि युगांडा इत्यादी देशांमध्ये आढळून येते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून कापूर तुळशीचा विचार केला तर प्रामुख्याने या तुळशीच्या अर्काचा उपयोग हा पूर्व आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने पोटदुखी, गोवर, सर्दी खोकला तसेच अतिसार इत्यादी आरोग्य विषयक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून केला जातो. तसेच या तुळशीचा उपयोग हा डास आणि इतर साठवण कीटकांचा नायनाट करण्यासाठी देखील केला जातो.
2- पंजाबी किंवा काळी तुळस– या तुळशीला अमेरिकन तुळस म्हणून देखील ओळखले जाते. ही तुळस प्रामुख्याने भारतात तसेच चीन आणि आग्नेय आशिया व आफ्रिकेमध्ये आढळून येते. याशिवाय ख्रिसमस बेट आणि उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या काही भागांमध्ये देखील काळी अथवा पंजाबी तुळशीची लागवड केली जाते.
3- औषधी तुळस– तुळशीचा हा प्रकार खूप फायद्याचा असून पारंपारिकपणे या तुळशीच्या पानांचा रस तापाच्या उपचारांसाठी महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो आणि याचा अर्क हा खोकला, ताप तसेच अतिसार,पचनाच्या समस्या, जखम बरी करण्यासाठी तसेच हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह यावर उपयोगी आहे. तसेच या तुळशीच्या पानांचे तेल जंतुनाशक म्हणून देखील वापरले जाते.
4- कृष्ण तुळस– या तुळशीच्या प्रजातीला पवित्र तुळस म्हणून देखील ओळखले जाते. तुळशीचा हा प्रकार आयुर्वेदातील औषधी आणि अध्यात्मिक गुणधर्मांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर खोकला, अतिसार, अस्थमा, ताप, डोळ्यांचे आजार, संधिवात, अपचन आणि जठरांसंबंधी जे काही आजार आहेत त्यावर गुणकारी म्हणून ओळखली जाते.
5- गोड अथवा रान तुळस– रान तुळस अथवा गोड तुळस ही सुगंधी औषधी वनस्पतींपैकी एक असून या वनस्पतीचा उगम हा दक्षिण आशिया खंडातून झालेला आहे. तुळशीच्या या प्रजातीच्या लागवडीचा विचार केला तर ही युरोपच्या भूमध्य प्रदेशांमध्ये व आशिया आणि आफ्रिकेमध्ये अनेक ठिकाणी केली जाते.
6- लवंग तुळस किंवा ट्री बेसिल– तुळशीचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा प्रकार असून लवंग तुळस ही चार फूट उंचीपर्यंत वाढू शकते. तसेच एखाद्या वृक्षासारखे या जातीच्या तुळशीचे खोड गडद हिरव्या व जांभळ्या रंगाचे असते. या जातीच्या तुळशीला मोठी व लंब वर्तुळ, फिकट हिरव्या रंगाची पाने असतात. लवंग तुळस ही खूप सुगंधित असते व हिच्या सुगंधामुळे त्याला तीव्र लवंगाचा सुगंध मिळतो.