Floriculture Farming:- बऱ्याच व्यक्तींना रुळलेला आणि स्थिर मार्ग सोडून जीवनात एखादी जोखीम पत्करून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. त्याकरिता ते कुठलीही किंमत मोजायला तयार असतात व कशाही पद्धतीचे कष्ट उपसायला तयार असतात. असे अनेक अवलिया आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. त्यातल्या त्यात एखादा चांगला व्यवसाय असेल किंवा चांगली नोकरी असेल व अशा पद्धतीने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात उडी घेणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे या म्हणी सारखे आहे.
परंतु काहीजण ही जोखीम पत्करतात आणि कष्ट करून यशस्वी देखील होतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यातील दफेदार पूर्वा येथील मोईनुद्दीन नावाच्या शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने काहीसा असाच प्रकार केला असून चक्क वकिलीची प्रॅक्टिस सोडून फुलशेतीकडे वळला. इतकेच नाही तर फुल शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात यश देखील मिळवले आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.
फुलशेतीतून आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यात असलेल्या दफेदार पूर्वा या गावचे मोईनुद्दीन यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून तरी देखील त्यांनी वकिलीचा व्यवसाय न करता फुल शेती करण्याचे ठरवले. साधारणपणे 2002 मध्ये त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सोडली व फुलांची लागवड सुरू केली. सुरुवातीला त्यांनी ग्लॅडीओलस या फुलांच्या जातींची लागवड केली व त्या माध्यमातून लाखोंची कमाई सुरू केली आहे.
त्यांच्या प्रयत्नाने या त्यांच्या गावांमध्ये फुलशेती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली व आता या गावाला फुलांचे गाव म्हणून देखील ओळखले जाते. यूपी मधील पहिले पॉलिहाऊस मोईनुद्दीन यांनी स्थापन केले व त्यामध्ये जरबेराची लागवड केली. जरबेरा लागवडीतून देखील ते लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर लखनऊ या ठिकाणहून त्यांनी एलएलबी पास आऊट केली.
परंतु कायद्याचा अभ्यास न करता त्यांनी त्यांच्या घरच्या शेतीमध्ये फुलशेती करणे सुरू केले. सुरुवात त्यांनी ग्लॅडीओलस या फुलांच्या लागवडीतून केली या माध्यमातून त्यांना चार ते पाच महिन्यांमध्ये सुरुवातीला 40 ते 45 हजार रुपयांचा नफा मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता 2009 मध्ये उत्तर प्रदेशात पॉलिहाऊस उभारून हॉलंडचे विदेशी फुल जरबेराची देखील लागवड सुरू केली.
जरबेरा लागवड करून त्यांना एका वर्षात पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळायला लागले. आज सहा एकर क्षेत्रामध्ये ग्लॅडिओलस फुलांची तर एका एकरामध्ये जरबेरा फुलांची लागवड त्यांनी केलेली आहे. फुलेशेतीच्या माध्यमातून केलेली ग्लोडीओलस आणि जरबेरा या विदेशी फुलांची लागवडीतून त्यांना वार्षिक आता 70 ते 75 लाख रुपये मिळत आहेत.
कसे आहे त्यांचे फुलशेतीचे अर्थकारण?
मोईनुद्दीन यांच्या मते पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये फुलशेतीत चांगला फायदा मिळतो. सामान्य पद्धतीने शेती केली तरी एका एकर मध्ये 30 ते 40 हजार रुपये मिळतात.तर पॉलिहाऊस शेतीच्या माध्यमातून त्या जमिनीवर जरबेराची प्रति एकर 15 ते 20 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
जरबेरा फुलाला सरासरी पाच रुपये प्रति फुल भाव असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी उत्पादित केलेले फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होते व किमती कधीकधी वर खाली होत राहतात. एका एकर पॉलिहाऊसमध्ये 25 हजारापर्यंत जरबेराची रोपे लावली जातात व एका झाडाला वर्षभर 35 ते 40 फुले येतात या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई ते करतात.
तसेच एका एकर ग्लॅडिओलस फुलांची लागवड करून ते चार ते पाच महिन्यात एक ते दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत. पॉली हाऊसचे इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स याबद्दल त्यांनी सांगितले की पॉलिहाऊस बांधण्यासाठी 60 लाख रुपये खर्च येतो व ज्यामध्ये 50 टक्के सरकारी अनुदान मिळते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या फुलांची एकदा लागवड केली की पाच ते सहा वर्ष या माध्यमातून फुलांचे उत्पादन मिळत राहते.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी केला आहे गौरव
जेव्हा मोईनुद्दीन यांनी विदेशी फुलांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण बाराबंकी जिल्ह्यात ते एकटे शेतकरी होते. कालांतराने हळूहळू काही शेतकरी त्यांना येऊन मिळाले आणि आता बाराबंकी परिसरातील दोन ते अडीच हजार शेतकरी त्यांच्यासोबत आहेत.
जे शेतकरी अगोदर शेतीमधून कुठलाही प्रकारच्या पैशाची बचत करू शकत नव्हते तेच शेतकरी आज फुलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मोईनुद्दीन यांच्या कामामुळे प्रभावित होऊन त्यांचा गौरव केला होता व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी देखील म्हणून मोईनुद्दीन यांचे कौतुक केले आहे.
दफेदार गावाची नवीन ओळख आहे आता फुलांचे गाव
पारंपारिक शेतीच्या तुलनेमध्ये फुल शेतीमध्ये चांगला नफा मिळत असल्याने अनेक शेतकरी आता फुल शेती करत असून मोईनुद्दीन यांच्या सल्ल्यानुसार आता गावातील बरेच शेतकरी ग्लॅडिओलससारख्या फुलांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
काही कालावधीनंतर ग्लॅडिओलस फुलांची लागवड संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी सुरू केली असून सध्या 50 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर ग्लोडीओलस लागवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता दफेदार या गावाची ओळख फुलांचे गाव म्हणून अशी होऊ लागली आहे.