Farmer Success Story: ‘या’ तरुणाने तयार केली पाच प्रकारची फवारणी यंत्रे! एका एकरची फवारणी 40 मिनिटात शक्य, वाचा किंमत

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story:- आपल्या शिक्षणाचा किंवा घेतलेल्या पदवीचा वापर सामाजिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये कौशल्याने करणे ही कला फार कमी जणांना अवगत राहते. जेव्हा आपण समाजात जीवन जगत असताना किंवा एखादा व्यवसायात पदार्पण करत असताना  आपण शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करता येणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते तरच त्या शिक्षणाला महत्त्व राहते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव येथील योगेश गावंडे या तरुणाचा विचार केला तर त्याने बीई मेकॅनिकलची पदवी मिळवली असून या माध्यमातून मिळवलेले ज्ञानाचा वापर करून तो आता कृषी उद्योजक होण्याच्या वाटेवर आहे.

शेतकरी कुटुंबातील असलेल्या या तरुणाने शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या पिकांवर फवारणी करता येईल अशा फवारणी यंत्रांची निर्मिती केली असून त्याने एक नाही तर तब्बल पाच यंत्रांची निर्मिती केलेली आहे.

 अशी सुचली कल्पना

योगेश जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याच्या चुलत भावाला पिकांवर फवारणी करताना विषबाधा झाली. तेव्हा या प्रसंगावरून त्याने ठरवले की आपण जे इंजिनिअरिंग मध्ये ज्ञान मिळवलेले आहे त्याचा वापर करून आपण शेतकऱ्यांना सुरक्षितपणे फवारणी कशी करता येईल?

अशा प्रकारच्या यंत्राची निर्मिती का करू नये? तसेच अशा पद्धतीची यंत्रांची निर्मिती करण्याचा सल्ला वडिलांनी देखील योगेशला दिला.त्यानंतर योगेश आणि तीन विद्यार्थी यांनी मिळून फवारणी यंत्र विकसित करून त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून असलेल्या प्रोजेक्टमध्ये ते सादर केले व त्याला प्रथम पारितोषिक मिळाले.

त्यानंतर आईकडून काही पैसे योगेशने घेतले आणि प्राथमिक पातळीवरचे फवारणी यंत्र बनवले. कालांतराने या बनवलेल्या फवारणी यंत्रावर अधिक संशोधन करण्यात आले व टप्प्याटप्प्याने त्यामधील त्रुटी दूर करून फवारणीचे काम सोपे व्हावे या दृष्टीने सुधारित यंत्र तयार करण्यात आले आहेत.

तसेच मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सने देखील या करता निधी देऊ केला व कंपनी स्थापन करून आज व्यवसायिक पातळीवर पाच प्रकारची यंत्र तयार करणे त्यांना शक्य झाले.

 ही आहेत पाच प्रकारचे फवारणी यंत्रे

1- मानवचलित फवारणी यंत्र हे यंत्र चालवण्याकरिता मानवी ऊर्जेची गरज भासते व 24 लिटर ची टाकी असलेल्या या यंत्राची किंमत दहा हजार रुपये इतकी आहे.

2- बॅटरी फवारणी यंत्र या फवारणी यंत्राला बॅटरी व मोटरची ऊर्जा देण्यात आलेली असून या यंत्राची किंमत बारा हजार रुपये आहे.

3- टू इन वन फवारणी यंत्र या प्रकारचे फवारणी यंत्र हे मानवी ऊर्जा व बॅटरी अशा दोन्ही माध्यमातून ऑपरेट होते. समजा फवारणी सुरू असताना मध्येच बॅटरी संपली तर तुम्हाला घरी न येता ते मानवी ऊर्जेच्या साह्याने चालवता येते व याची किंमत 14 हजार रुपये आहे.

4- इंजिनचलित पंप या फवारणी यंत्रामध्ये दोन एचपी इंजिनची ताकद यंत्राला देण्यात आलेली असून त्यामुळे ते चालवणे अधिक सोपे जाते. आंब्यासारख्या उंच फळझाडांवर तर फवारणी करायची असेल तर इंजिनचलित पंप फायद्याचे असून याची किंमत तीस हजार रुपये आहे.

5- सौर ऊर्जेवरील यंत्र या यंत्राला सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऑपरेट करण्याची सिस्टम देण्यात आलेली असून एखाद्या वेळी जर काही एकर क्षेत्राची फवारणी करत असताना बॅटरी संपण्याची शक्यता असते परंतु सौरऊर्जेवरील हे यंत्र पाच तासापर्यंत काम करत राहते.

 या यंत्राची साधारणपणे वैशिष्ट्ये

याच्यातली बहुतेक  यंत्र एका चाकावर  चालणारे असून यामधील मानवचलित कुठल्याही प्रकारचे इंधनाची गरज नाही. सुमारे 40 मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्राचे फवारणी शक्य होते. यंत्रांच्या माध्यमातून तुम्ही उभे आणि आडव्या अशा दोन्ही पद्धतीने फवारणी करू शकतात. उंच मांडव असलेल्या वेलवर्गीय पिकांमध्ये देखील आरामात फवारणी करता येणे शक्य आहे

तसेच या पिकांची उंची पाच ते सहा फूट असते अशा पिकांमध्ये देखील फवारणी करता येते. या यंत्रांच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन तसेच हळद, आले, मिरची, टोमॅटो, कोबी तसेच फ्लावर आणि भेंडी सारख्या पिकांवर लागवड करू शकतात.

अशा पद्धतीने या यंत्रांचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe