Cumin Cultivation:- शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पिके शेतकरी घेऊ लागले असून यामध्ये अनेक प्रकारची फुल पिकांपासून ते मसाल्याच्या पिकांपर्यंतचे प्रयोग शेतकऱ्यांच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या साह्याने केले जात आहेत.
परंपरागत शेती पद्धत व पिकांची लागवड आता काळाच्या ओघात मागे पडली असून त्या जागी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस घेताना दिसून येत आहेत. बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने बदलती शेती पद्धत व पिकांची लागवड शेतकऱ्यांना येणाऱ्या भविष्यकाळात फायद्याची ठरेल हे मात्र निश्चित.
त्यामुळे याच मुद्द्याला धरून जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चार गावांमध्ये आता चक्क जीरा लागवडीचा प्रयोग करण्यात आलेला आहे. नेमका हा प्रयोग कसा राबवला जात आहे? यासंबंधीची माहिती या लेखात घेऊ.
संगमनेर तालुक्यात राबवला जात आहे जिरा लागवडीचा प्रयोग?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृषी विभागाने आत्माच्या पुढाकारातून संगमनेर मधील चार गावांमध्ये तीन एकर क्षेत्रावर जिरा लागवडीचा प्रयोग केला असून याकरिता आत्माकडून शेतकऱ्यांना जीरा पिकाचे बियाणे मोफत देण्यात आलेले आहे. तसेच विशेष म्हणजे या पिकाचे व्यवस्थापनाचे काम आणि मार्गदर्शन हे कृषी विभागाचे अधिकारी करत आहेत.
त्यासाठी संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी, निमगाव भोजापूर, कोळवाडे आणि नीमज या चार गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गावातील आत्मा अंतर्गत असलेल्या शेतकरी गटामार्फत तीन एकर क्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर ही जीरा लागवड करण्यात आलेली असून एक महिन्याच्या कालावधीत या जीरा पिकाची उगवण देखील चांगली झालेली आहे.
जीरा पीक प्रामुख्याने भारतातील राजस्थान व गुजरात या राज्यांमध्ये घेतले जाते. कारण त्या ठिकाणचे वातावरण या पिकाला योग्य आहे. अगदी त्याच पद्धतीचे वातावरण नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर या भागांमध्ये असल्याने जीरा पीक या ठिकाणी येईल याचा अंदाज असल्यामुळे आता संगमनेर तालुक्यात जिरा लागवडीचा प्रयोग राबविण्यात आलेला आहे.
हेक्टरी किती मिळू शकते जिऱ्याचे उत्पादन?
प्रामुख्याने गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये लागवड केले जाणारे जीरा हे पीक असून त्याचा एकूण कालावधी 110 दिवसांचा आहे. योग्य व्यवस्थापनात ठेवले तर हेक्टरी आठ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन गुजरात व राजस्थान राज्यामध्ये याचे मिळते. संगमनेर मध्ये पाच क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळेल अशी कृषी विभागाला अपेक्षा आहे.
तसेच हे कमीत कमी पाण्यावर येणारे पीक आहे. साधारणपणे त्याच्या 110 दिवसांच्या कालावधीत तीन वेळा पाणी द्यावे लागते. तसेच खर्च देखील याला खूप कमी लागतो. जर आपण सध्या बाजारपेठेतील जिऱ्याचे दर पाहिले तर ते साठ ते ऐंशी हजार रुपये प्रति क्विंटल इतके आहेत.
त्यामुळे येणाऱ्या कालावधीत हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.