Health Tips:- आजकाल वाढत्या वजनाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर बऱ्याच लोकांना येते व यामुळे बरेच जण त्रस्त असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपाय योजना तसेच व्यायाम, आहाराच्या दृष्टिकोनातून अनेक पथ्य पाळणे गरजेचे असते.
वजन कमी करण्यासाठी असे व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. परंतु तरीदेखील वजन कमी होते असे नव्हे. तसेच आहाराच्या दृष्टिकोनातून असलेल्या पथ्यांचा विचार केला तर यामध्ये भात खाण्याचे टाळले जाते.
कारण असे म्हटले जाते की भात खाल्ला तर वजन जास्त वाढते. परंतु जर आपण दक्षिण भारताचा विचार केला तर किंवा भारतातील किनारपट्टी वरच्या भागाचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहारात भाताचा आणि माशांचा वापर केला जातो.
दक्षिण भारतामध्ये तर सगळ्यात जास्त आहारात भाताचा वापर होत असतो. तेव्हा आपल्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडतो की दक्षिण भारतातील लोक दिवस-रात्र भात खाऊन देखील यांचे वजन कसे वाढत नाही?
जर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर दक्षिण भारतामध्ये वंशपरंपरागत तांदळाच्या ज्या जाती आहेत त्या खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना आहेत.
त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांचे भात खाऊन देखील वजन वाढत नाही. या अनुषंगाने या लेखात आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या तांदळाच्या काही जातींची माहिती घेणार आहोत.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या तांदळाच्या जाती
1- रेड राईस अर्थात लाल तांदूळ- जर आपण आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या सफेद तांदळाच्या तुलनेत जर पाहिले तर हा तांदूळ खूप महाग असतो. तसेच दुकानांमध्ये देखील विक्री करिता कमी प्रमाणात उपलब्ध असतो.
तुम्हाला जर पौष्टिक आहार घ्यायचा असेल तर तुम्ही या तांदळामध्ये इतर काही पौष्टिक घटक मिसळून हेल्दी जेवणाचा आनंद घेऊ शकतात. या तांदळामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जसे की विटामिन सी आणि बीटा केरोटीन हे होय.
तसेच या तांदळामध्ये अँटिऑक्सिडंट, फायबर आणि अँथोसायनिस, फ्लेओनॉड्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आरोग्याला खूप मोठा फायदा होतो.
तसेच लाल तांदूळ हा एक सेंद्रिय तांदूळ असून पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदुळाच्या तुलनेमध्ये जास्त पौष्टिक असतो. तसेच लाल तांदळामध्ये मॅगनीज चे प्रमाण जास्त असते व त्यामुळे हाडांना खूप मोठा फायदा होतो.
2- कुरुवी कर– या तांदळाचे उत्पादन प्रामुख्याने केरळ राज्यातील दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या तांदळामध्ये सूक्ष्म पोषक घटक जास्त असतात आणि आदिवासी लोकांमध्ये हा तांदूळ मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो.
3- कैवरा सांब– अगदी कमी मातीत देखील भाताची ही जात चांगली वाढते. संशोधनाचा आधार घेतला तर हा तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो. त्यामुळे डायबिटीसमध्ये या तांदळाचा चांगला फायदा होतो.
4- कोलियाल– हा केरळ राज्यामध्ये पिकणारा तांदूळ असून तपकिरी रंगाचा आहे. केरळमधील प्रसिद्ध नाष्टातील पदार्थ पुट्टू असून हा पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो.
5- काळी कावूणी– तामिळनाडूमध्ये आढळणारा हा प्रमुख भात असून यामध्ये उच्च अंथोसायनिन घटक असल्यामुळे याचा रंग काळा जांभळा असतो. शरीराला थंड ठेवण्यासाठी हा तांदूळ खूप फायद्याचा असून हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना हा तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
6- पुंगार- हा एक गोड सुगंधी प्रकाराचा तांदूळ आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याच्या काही भागांमध्ये स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान दिला जातो.
कारण स्त्रियांना गर्भधारणेच्या दरम्यान ज्या काही अनेक समस्या असतात त्या या तांदळाच्या सेवनाने टाळल्या जातात असे मानले जाते. तसेच रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते व कोलेस्ट्रॉल कमी होतो व हिमोग्लोबिन देखील वाढते.