Cotton Market Rate:- यावर्षीच्या हंगामामध्ये कापसाच्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग केला असून गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी वाढलेले कापसाचे भाव मागच्या आठवड्यापासून परत क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाल्याचे चित्र आहे. अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवलेला आहे.
त्यातच आता कापसाचे भाव परत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. कापसाच्या भावात ही घसरण का झाली? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापसाचे हे भाव कमी होण्यामागे काही कारण असून त्यांचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
या तीन कारणांमुळे मागच्या आठवड्यात कापसाच्या भावात नरमाई
1- मार्च एन्डचा परिणाम– मागच्या आठवड्यामध्ये कापसाचे सरासरी भाव पातळी साधारणपणे 7400 ते 7800 रुपयांपर्यंत होती व त्यामध्ये घसरण होऊन हे भाव 7200 ते 7700 रुपयांपर्यंत कमी झाले. साधारणपणे प्रति क्विंटल शंभर रुपये कमी झाल्याचे सध्या चित्र आहे.
सध्या मार्च महिना सुरू असून व्यापारी आणि उद्योग व्यवसायामध्ये मार्च एंडला खूप महत्त्व असते. कारण या कालावधीमध्ये व्यापारी अनेक प्रकारचे व्यवहार कमी करतात किंवा बंदच करतात. कारण या कालावधीमध्ये व्यापारी आपले खाते नवं जुनं करत असतात.
प्रत्येक वर्षी आपल्याला ही स्थिती दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाच्या दरामध्ये चढ-उतार सुरू असून वायदयासोबतच प्रत्यक्ष कापूस खरेदीचे दरदेखील काहीसे नरमले आहेत. याचा देखील परिणाम देशातील बाजारावर दिसून येतो.
2- देशातील वाढलेले कापसाचे अंदाज– मागच्या आठवड्यामध्ये देशातील तीन महत्त्वाच्या संस्थांनी देशाच्या कापूस उत्पादनाबद्दलचे अंदाज वाढवले. या तीन संस्थांमध्ये अमेरिकेचा कृषी विभाग तसेच कापूस वापर आणि उत्पादन समिती म्हणजे
सीसीपीसी आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांचा समावेश आहे. या तीनही महत्त्वाच्या संस्थांनी भारतातील कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवले व याचा देखील परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
3- आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव– आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या भावात नरमाई आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमधील कापसाचा भाव 97 सेंट प्रतिपाउंड दरम्यान होता. सध्या भारताच्या रुईचा भाव 90 ते 94 सेंट प्रतीपाउंडच्या दरम्यान आहे.
परंतु तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर हे भारतातील कापसापेक्षा जास्तच आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कापसाला निर्यातीसाठी आणखी मागणी आहे.
भारतातील सूत आणि कापडाला देखील उठाव चांगला मिळत आहे. मार्च एंड मुळे व्यवहारांमध्ये काहीसे थंडावल्याचे वातावरण असले तरी देखील एप्रिल पासून व्यवहार पूर्ण पूर्वपदावर येतील अशी शक्यता आहे.
कधी बाजारभावांची स्थिती येईल पूर्वपदावर?
साधारणपणे एप्रिलमध्ये सूत तसेच कापड व कापसाचा उठाव पूर्वीप्रमाणे होऊ शकतो व त्यामुळे कापसाच्या भावामध्ये जी काही घसरण झालेली आहे त्यामध्ये पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कापसाचे भाव पुन्हा अगोदरच्या पातळीवर पोहोचतील असा अंदाज कापुस बाजारातील तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.