Loan Against Property:- आयुष्यामध्ये केव्हा कोणत्या प्रकारची परिस्थिती उद्भवेल आणि केव्हा मोठ्या प्रमाणावर पैसा लागेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते. कारण घरांमध्ये लग्न समारंभ किंवा हॉस्पिटलचा खर्च,
व्यवसाय उभारणे किंवा आहे त्या व्यवसायात वाढ करणे अशा बऱ्याच कामांसाठी आपल्याला पैशांची आवश्यकता असते व आपण या पैशांची गरज भागवण्यासाठी बरेच जण कर्जाचा आधार घेतात व पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न करतात.

परंतु जर पर्सनल लोनपेक्षा प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेवर कर्ज घेतले तर ते सुरक्षित कर्ज श्रेणी अंतर्गत येते व पर्सनल लोनपेक्षा यामध्ये तुम्हाला करात सूट मिळते व इतर देखील अनेक फायदे मिळतात.
त्यामुळे या लेखात आपण प्रॉपर्टी लोन म्हणजेच मालमत्ता गहाण ठेवून घेण्यात येणाऱ्या कर्जाचे फायदे व इतर महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
प्रॉपर्टी लोनचे वैशिष्ट्ये
1- जास्त कर्जाची रक्कम– प्रॉपर्टी लोन हे सुरक्षित प्रकारातले कर्ज असल्यामुळे ते मालमत्तेवर दिले जाते व त्यामुळे जास्त कर्जाची रक्कम आपल्याला सहजपणे मिळू शकते.
2- कमी व्याजदर– जर आपण प्रॉपर्टी लोन वर आकारण्यात येणाऱ्या व्याजदराचा विचार केला तर तो पर्सनल लोनवरील व्याजदरापेक्षा खूपच कमी असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर पर्सनल लोन वर बँकांचा व्याजदर 10.25% पासून सुरु होतो तर प्रॉपर्टी लोनवरील व्याजदर 8.75% पासून सुरु होतो.
3- परतफेडीचा सुलभ कालावधी– जर तुम्ही प्रॉपर्टी लोन घेतले तर त्याचा परतफेडीचा कालावधी साधारणपणे वीस वर्षापर्यंत असतो. त्यामुळे कमी ईएमआय आणि सहजपणे परतफेड करता येते.
4- कर्ज दुसऱ्या बँकेकडे करता येते हस्तांतर– या कर्जामध्ये बॅलन्स ट्रान्सफर सुविधा देखील देण्यात येते. त्यामुळे तुम्ही तुमचे चालू असलेले तारण कर्ज कमी व्याजदरावर किंवा कर्जाच्या चांगल्या अटींवर दुसऱ्या बँक किंवा कर्ज संस्थेकडे हस्तांतरित करू शकतात.
5- करात मिळतो लाभ– प्रॉपर्टी लोनवर दिलेले व्याज आयकर कायदा 1961 च्या कलम 37(1) अंतर्गत करमुक्त आहे. जर या कर्जाची रक्कम नवीन घर खरेदी करण्यासाठी वापरली असेल तर कलम 24 अंतर्गत कर्जावर जे काही व्याज भरले जाते त्यावर दोन लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.
प्रॉपर्टी लोनकरिता आवश्यक पात्रता
1- अर्जदाराचे किमान वयोमर्यादा 18 ते कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असावी.
2- अर्जदार हा नोकरी, व्यावसायिक आणि गैरव्यवसायिक क्षेत्रामध्ये काम करणारा असावा.
3- तसेच दरमहा 12000 रुपये किमान पगार असावा व वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये प्रति वर्ष असावे.
4- सध्याच्या विद्यमान संस्थेमध्ये किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा.
5- जास्तीत जास्त या माध्यमातून 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज रक्कम मंजूर होऊ शकते व या कर्जाचे मूल्य मालमत्ता मूल्याच्या 75 टक्के पर्यंत असते.
6- क्रेडिट स्कोर साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त असावा.
7- या कर्जासाठी तारण ठेवणार आहात ती मालमत्ता निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक असावी.
प्रॉपर्टी लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1- मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा पॅन कार्ड
2- राहण्याचा पुरावा म्हणजेच ऍड्रेस प्रूफ म्हणून (रेशन कार्ड, टेलिफोन बिल, विज बिल, भाडेकरार, पासपोर्ट प्रत, बँक पासबुक किंवा बँकेचे स्टेटमेंट, ड्रायव्हिंग लायसन्स)
3- वयाचा पुरावा म्हणून( पॅन कार्ड/ पासपोर्ट/ वैधानिक प्राधिकरणाकडून इतर कोणतेही प्रमाणपत्र)
4- मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट/ बँक पासबुक किंवा मागील सहा महिन्यांची पगार स्लीप
5- फॉर्म 16 आणि तीन वर्षाचे आयकर रिटर्न