अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील बोटा-केळेवाडी येथे पाण्यावरून दोन गटांत वाद सुरू आहेत. हा वाद रविवारी चांगलाच उफाळला. एका गटाने कुऱ्हाड व दगडाने पाइपलाइन फोडल्या, तर दुसऱ्याने महिंद्रा गाडीची तोडफोड केली.
परस्पर विरोधी फिर्यादीवरून ७० जणांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.
दोन्ही गट एकमेकांना भिडले असता पोलिसांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक तरुण जिवाच्या आकांताने पळु लागला असता त्याने तळ्यात उडी मारली. मात्र, त्यास पोहता येत नसल्यामुळे तो तळ्यात बुडून मयत झाला आहे. निकेश लक्ष्मण लामखेडे (वय 30) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
बोटा-केळेवाडी येथील लघू पाटबंधारे विभागाच्या तलावातील पिण्याच्या पाण्यावरून दोन गटांत जुना वाद आहे. अनेकदा पाण्यावरून भांडणे होत असतात. रविवारी रात्री देखील हे दोन गट आमने-सामने आले. सुभाष बाजीराव लामखडे यांनी तलावातील पाणी उचलले, या कारणावरून पोलिसात तक्रार दिली होती.
याचा राग धरून २८-२९ जणांच्या जमावाने त्यांची बोअरवेलची पाइपलाइन कुऱ्हाड व दगडाने फोडून मोठे नुकसान केले. सुनील मनाभाऊ लामखडे हे रविवारी रात्री १० वाजता घरी जात असताना ३५-४० लोकांच्या जमावाने गाडी अडवून ‘तू आमची पाइपलाइन फोडतो का, या रस्त्याने जायचे नाही, पाइपलाइन फोडली तसे तुला फोडून काढू’, असा दम दिला, तर महिंद्राच्या काचा फोडून नुकसान केले.
सोमवारी सुभाष लामखडे व सुनील लामखडे यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्यावरून घारगाव पोलिसांनी जवळपास ७० जणांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश व संचारबंदीचे उल्लंघनानुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलिसांनी केळेवाडीत मोठा फौजफाटा तैनात केला. मंगळवारी या पळापळीत निकेश लामखडे हा तरुण शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरेवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com