Success Story:- आजकाल अनेक सुशिक्षित तरुण हे छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळले असून मोठ्या प्रमाणावर या व्यवसायांमध्ये यशस्वी झाले आहेत व लाखो रुपये देखील कमावत आहे. कारण नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे व्यवसाय करण्याशिवाय आता पर्याय नाही.
त्यामुळे छोट्या छोट्या परंतु मार्केटमध्ये चांगले मागणी असलेले व्यवसायांची उभारणी करून बरेच तरुण आता यशस्वी होताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मनीष यादव या तरुणाचे उदाहरण घेतले तर त्यांनी दिल्लीमध्ये 15 फूट बाय 15 फूट खोलीत मशरूम लागवडीचा व्यवसाय सुरू केला व आज तो महिन्याला पाच लाख रुपये इतके उत्पन्न मिळवत आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

एका खोलीतून सुरू केलेल्या मशरूम व्यवसायाने दिली आर्थिक समृद्धी
मनीष यादव हा एक उच्च शिक्षित तरुण असून त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्याने यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. परंतु मध्यंतरी संपूर्ण देशामध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले व यामुळे मनीषच्या सगळ्या प्लॅनिंगला खीळ बसली.
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मनीष यादव यांच्या एका मित्राने त्यांना मशरूम शेती करण्याचा सल्ला दिला. कारण मनीष यादव चा मित्र अगोदर पासून बटन मशरूम लागवड करून चांगला नफा मिळवत होता. नजीकच्या कालावधीमध्ये चांगली नोकरी मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे मनीष यादवला देखील मित्राचा सल्ला आवडला व मनीष राहत असलेल्या दक्षिण पश्चिम दिल्लीतील कंगन हेरी या गावच्या आझादपूर मंडी पासून 40 किलोमीटर अंतरावर हा व्यवसाय सुरू करायचे ठरवले.
तसेच एमबीए मध्ये स्वतः पदवीधर असल्यामुळे त्याला मशरूमची मार्केटिंग आणि लॉजिस्टिक मध्ये कुठलीही अडचण येणार नाही असा विश्वास होता. तसेच महत्त्वाचे म्हणजे आझादपूर मंडी ही फळे व भाज्यांची आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्याचाही फायदा मनीष यादव याला झाला.
एका खोलीतुन केली व्यवसायाला सुरुवात
मित्राकडून मनीषने काही प्राथमिक माहिती घेतली व त्याच्या जुन्या घरातील एका खोलीत हा प्रयोग करावा असे त्यांनी ठरवले. याकरिता त्याने सोनीपत मधील एका विक्रेत्याकडून 50 किलो मशरूमच्या बिया आणल्या व त्या 90 रुपये प्रति किलो दराने विकत घेतल्या. त्यासाठी आवश्यक असलेले खत आठ रुपये किलो दराने 5000 किलो घेतले.
जवळपास हे खत चाळीस हजार रुपयाला पडले. त्यानंतर घरच्या पंधरा फूट बाय पंधरा फूट खोलीमध्ये मशरूमच्या बिया आणि दोन बेड असलेल्या पाचशे पिशव्या असा सेट उभा करून व्यवसायला सुरुवात केली. या पाचशे पिशव्यांमधून 1000 किलो मशरूमचे उत्पादन मिळाले
व आपण मशरूमची बाजारामधील किंमत पाहिली तर ती हंगामानुसार शंभर ते 450 रुपये प्रति किलो असते. यामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये किलोपर्यंत देखील मशरूमची किंमत पोहोचते. अशा पद्धतीने मनीष यादव यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
व्यवसायातून मिळते 60 लाख रुपये वार्षिक उत्पन्न
मनीष प्रयत्न करत राहिले व व्यवसाय वाढत गेला व आता त्यांच्या या मशरूम युनिटचे नाव श्री श्याम मशरूम फार्म असे ठेवण्यात आले आहे. मनीष यादव हे आता 1470 स्क्वेअर फुट जागेतून वर्षाला 60 लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. हा व्यवसाय आता एका खोलीपासून तीन खोल्यांपर्यंत पोहोचला आहे
व वार्षिक मशरूमचे उत्पादन 40000 किलो इतके होत आहे. मागच्या महिन्यामध्ये मनीषने पिकवलेले बटन मशरूम साडेचारशे रुपये किलोने विकले गेले व प्रत्येक पिशवीतून दोन किलो मशरूम त्यांना मिळाले. मशरूमचे उत्पादन पाहिले तर पाचशे चौरस फूट खोलीतून प्रत्येक वेळेला 2600 किलो पर्यंत मशरूम उत्पादन त्यांना मिळते.