Tur Variety: तुरीच्या लवकर काढणीस येणाऱ्या ‘या’ तीन व्हरायटींची लागवड करा आणि हेक्टरी 20 ते 24 क्विंटल उत्पादन मिळवा

Published on -

Tur Variety:- खरीप हंगामामध्ये ज्याप्रमाणे सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते, अगदी त्या खालोखाल तूर हे पीक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात लागवड केले जाते. तुर पिकाची लागवड करताना बऱ्याचदा ते इतर मुख्य पिकांसोबत आंतरपीक म्हणून देखील त्याचा अंतर्भाव केला जातो किंवा मुख्य पीक म्हणून देखील तुरीची लागवड केली जाते.

तुर पिक शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून खूप महत्वाचे पीक आहेच परंतु जमिनीचा पोत सुधारण्यासाठी देखील ते मदत करते.अवर्षणासारखा कालावधी असेल तरीदेखील पाण्याच्या कमीत कमी पुरवठ्यावर देखील हे पिक उत्तम पद्धतीने तग धरू शकते.

आता बरेच शेतकरी तूर लागवड करतील व याकरिता दर्जेदार व चांगले उत्पादनक्षम तुरीची बियाणे मिळावे याकरिता शेतकरी प्रयत्नशील असताना आपल्याला दिसून येतील. त्यामुळेच आपण या लेखामध्ये तूर या पिकाची अशा तीन  व्हरायटींची माहिती घेणार आहोत जे लवकर, मध्यम लवकर परिपक्व होणारे वरायटी म्हणून ओळखले जातात.

 तुरीच्या या तीन व्हरायटी आहेत लवकर उत्पादन देणाऱ्या

1- गोदावरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या कृषी संशोधन केंद्र, बदनापूर या ठिकाणहून सन 2021 मध्ये तुरीचे गोदावरी हे वाण प्रसारित करण्यात आले. गोदावरी या वरायटीला फुले मळकट पांढरे रंगाचे येतात व दाण्याचा रंग सुद्धा पांढराच असतो. गोदावरी या तुरीच्या व्हरायटीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तूर रोगावर येणाऱ्या मर आणि वांझ रोगास ही व्हरायटी प्रतिकारक आहे.

गोदावरी या व्हरायटीच्या 100 तुरीच्या दाण्याचे वजन साधारणपणे 11 ग्रॅम येते. तसेच लागवडीनंतर साधारणपणे 160 ते 165 दिवसांमध्ये गोदावरी व्हरायटीचे तुर पिक काढणीस येते. तुरीच्या गोदावरी व्हरायटीच्या लागवडीतून हेक्टरी 19 ते 24 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.

2- फुले तृप्ती तुरीची ही व्हरायटी मध्यम लवकर कालावधीची असून कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून गुजरात तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये लागवडीसाठी 2022 मध्ये प्रसारित करण्यात आलेली वरायटी आहे.

फुले तृप्ती या व्हरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे तुर पिकावरील प्रमुख रोग असलेल्या मर आणि वांझ यांना मध्यम प्रतिकारक आहे. त्यासोबतच शेंगा पोखरणारी अळी व शेंगमाशी या किडींचा देखील प्रादुर्भाव या व्हरायटीवर कमी दिसून येतो. फुले तृप्ती व्हरायटीचे दाणे हे फिक्कट तपकिरी रंगाचे असतात व 100 दाण्याचे वजन 10.61 ग्राम येते.

या व्हरायटीचा परिपक्वता कालावधी म्हणजेच लागवडीनंतर काढणीस येण्याचा कालावधी साधारणपणे 167 ते 169 दिवसांचा आहे व या व्हरायटी पासून हेक्टरी 22 ते 23 क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.

3- रेणुका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत येणाऱ्या कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथून  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या  राज्यांकरिता लागवडीसाठी 2022 मध्ये रेणुका ही व्हरायटी प्रसारित करण्यात आली. रेणुका वरायटी देखील मर आणि वांझ या रोगांना प्रतिकारक्षम असून या व्हरायटीच्या शेंगा तसेच फांद्या, खोड हिरवेगार असते

व दाण्याचा रंग मात्र लाल असतो. वर पाहिलेल्या दोनही तुरीच्या व्हरायटीच्या दाण्यांपेक्षा रेणुका व्हरायटीच्या तुरीच्या 100 दाण्याचे वजन जास्त असते व ते 11.70 ग्रॅम भरते. लागवडीनंतर ही व्हरायटी 165 ते 170 दिवसात काढणीस तयार होते व हेक्टरी सरासरी 19 ते 22 क्विंटल उत्पादन मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News