काय आहे केंद्र सरकारची महिला कृषी सखी योजना? महिला कमवू शकतात 80 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न, वाचा माहिती

Published on -

केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाकरिता अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येत असून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढावा व या सगळ्या माध्यमातून महिलांची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी हा सरकारचा प्रामुख्याने उद्देश आहे. त्यामुळे अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत  करण्यात येते व त्यातून महिलांना एखादा व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाते.

भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारतामध्ये पुरुषांसोबत महिलावर्ग देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्रामध्ये काम करतात. या सगळ्या माध्यमातून महिलांना देखील शेतीकामांच्या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळावे व ते आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावेत याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी सखी योजना राबवली जात आहे व या अंतर्गत 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जवळपास 30 हजार कृषी सखींना प्रमाणपत्र देखील दिली आहेत. त्यामुळे हा उपक्रम महिलांना आर्थिक स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करण्यास नक्कीच मदत करेल.

 कसे आहे कृषी सखी योजनेचे स्वरूप?

कृषी सखी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना इतर शेतकऱ्यांना मदत करून शेतीतील उत्पादन वाढविण्यात कशी मदत करता येईल याबाबतीतले प्रशिक्षण दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून पिकांचे उत्पादन वाढवणे आणि शेतीमध्ये महिलांचा सहभाग निश्चित करणे इत्यादी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहेत.

कृषी सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना कृषी क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे व याकरिता 30 ऑगस्ट 2023 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यामध्ये सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे. या अंतर्गत प्रशिक्षित महिलांकरिता कृषी सखी प्रमाणीकरण कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे.

 तुम्हाला देखील कसे होता येईल कृषी सखी?

तुम्हाला देखील कृषी सखी बनायचे असेल व शेतीच्या कामांमध्ये मदत करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागते व त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाते. जेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र प्राप्त होते त्यानंतर तुम्ही कृषी सखी म्हणून काम करू शकता. कृषी सखी कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना शेती संबंधित महत्त्वाच्या विषयापैकी कोणत्याही एका विषयाचे 56 दिवस प्रशिक्षण घ्यावे लागते व त्यानंतर परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास कृषी सखीचे प्रमाणपत्र मिळते.

 या राज्यांमध्ये राबवला जात आहे कृषी सखी कार्यक्रम

देशामध्ये जवळपास कृषी सखी  कार्यक्रमासाठी 12 राज्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि मेघालय या राज्यांचा समावेश करण्यात आला आहे व या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News