Farmer Success Story:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला असल्याने शेतीमध्ये आता अनेक अशक्य गोष्टी शक्य झालेले आहेत. त्यांच्या मदतीने आता शेतीमध्ये सहजतेने कुठलीही पीक शेतकरी घेऊ लागले असून त्याचे भरघोस उत्पादन देखील मिळवताना आपल्याला दिसून येतात. याच मुद्द्याला धरून आपल्याला सफरचंद या फळ पिकाचे उदाहरण घेता येईल.
आतापर्यंत जर आपण सफरचंद असे जरी म्हटले तरी आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनात चटकन येते ते जम्मू काश्मीर आणि हिमाचल हे उत्तर भारतातील थंड राज्य होय. कारण सफरचंदासाठी लागणारे थंड हवामान या राज्यांमध्ये असल्याने त्या ठिकाणी सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

परंतु तंत्रज्ञानाच्या जोरावर आता सफरचंदाची शेती आता हिमाचल आणि काश्मीर मध्येच नाहीतर महाराष्ट्रात देखील शेतकरी करू लागले आहेत व यशस्वी उत्पादन देखील घेताना आपल्याला दिसून येत आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण खानदेश पट्ट्यातील धुळे जिल्ह्याचा विचार केला तर हा परिसर प्रमुख्याने कापूस तसेच मका आणि कांदा पिकांसाठी प्रसिद्ध असलेला परिसर असून या ठिकाणच्या जयवंत पाडवी या प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र यास पारंपरिक पिकांना फाटा देत चक्क सफरचंदाची शेती यशस्वी केली आहे.
धुळे जिल्ह्यात बहरली सफरचंदाची शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खान्देश पट्ट्यातील धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका असून या तालुक्यात असलेल्या उर्मदा या गावचे जयवंत पाडवी हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. ते त्यांच्या शेतामध्ये कायम वेगवेगळे प्रयोग करत असतात व याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी शेतामध्ये सफरचंदाची लागवड करायची ठरवले व त्याकरिता त्यांनी रेड वॉटर सफरचंदाची लागवड केली.
याविषयीचे संपूर्ण माहिती त्यांनी युट्युब आणि गुगल वरून मिळवली व संपूर्ण अभ्यास करून रेड वॉटर सफरचंदाची लागवड करण्याचे ठरवले. सगळ्यात यामध्ये त्यांनी जोखीम घेतली ती म्हणजे त्यांनी जे काही सफरचंदाची लागवड केली ती चक्क उन्हाळ्यामध्ये केली.
वास्तविक पाहता त्यांना अनेक जणांनी डिसेंबर महिन्यात लागवड करण्याचा सल्ला दिला होता. परंतु ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ या व्यक्तीप्रमाणे त्यांनी डिसेंबर महिन्याऐवजी उन्हाळ्यात लागवड केली व हा प्रयोग यशस्वी करून दाखवला.
एका झाडापासून दहा किलो पर्यंत उत्पादन मिळायला सुरुवात
लागवड केल्यानंतर त्यांनी व्यवस्थित व्यवस्थापन ठेवली व आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या आणि लागवडी नंतर आता 11 ते 13 महिन्यांनी त्यांच्या सफरचंदाच्या झाडांना फळे लगडायला सुरुवात झाली असून एक एक सफरचंद 100 ग्रॅम वजनाचे असून त्यांना गोडी देखील चांगली आहे. साधारणपणे त्यांना एका झाडापासून आठ ते दहा किलो सफरचंदाचे उत्पादन सध्या मिळताना दिसून येत आहे.
सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने शेती करणारे जयवंत पाडवी यांना फारसे उत्पन्न शेतीत मिळत नव्हते व कायमच आर्थिक फटका बसत होता. परंतु त्यांनी त्यामध्ये बदल करत रेड वॉटर सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला व आज यशस्वी उत्पादन देखील मिळवले आहे. सफरचंदाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन हाती येईल असा विश्वास देखील त्यांना आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की जर मनामध्ये इच्छा आणि जिद्द असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट शक्य करू शकतो व याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही.